केज : येथील बसस्थानक परिसरात स्वच्छता करण्याची मागणी नागरिकांकडून वेळोवेळी करण्यात येत आहे. मात्र, याकडे आगार प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. घाणीमुळे या परिसरामध्ये दुर्गंधी पसरली आहे.
मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून
माजलगाव : शहरातील नवीन बसस्थानकसभोवताल मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. दुर्गंधीचा त्रास येथील नागरिकांना करावा लागतो. परिणामी डासांचे प्रमाण वाढत आहे. स्वच्छतेची मागणी जोर धरू लागली आहे. जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपाययोजनांची मागणी आहे.
ग्रामीण भागात अवैध धंदे बोकाळले
जातेगाव : गेवराई तालुक्यात जातेगाव हे सर्कलचे गाव आहे. या ठिकाणी आठवडी बाजार गुरुवारी भरला जातो. या दिवशी टपरी व किराणा दुकानावर सर्रास गुटखा विक्री सुरू असते. तसेच अवैध धंदे, अवैध देशी-विदेशी दारू, अवैध वाहतूक मटका आदी धंदे जोरात सुरू आहेत. कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी येत असून, स्वच्छतेची वारंवार मागणी होत आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे.
माल्यार्पण करून अभिवादन
बीड : शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास विक्रांत हजारी, नितीन राजपूत, राणा चौहान, शीतल राजपूत, सोनल पाटील, अखिल बुंदेले, राजू बुंदेले आदी उपस्थित होते. यावेळी महाराणा प्रतापसिंह यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांचे आचारविचार आचरणात आणावेत, असा सूर यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
सर्रास विक्री सुरूच
वडवणी : राज्य शासनाकडून गुटखा विक्रीवर प्रतिबंध आहे. मात्र, शहर आणि परिसरातील गावात सहजरीत्या गुटखा उपलब्ध होत असल्याचे चित्र आढळून येत आहे. दुप्पट भावाने त्याची विक्री केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन, पोलिसांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.
टायमर स्वीच खराब
पाडळसिंगी : गावातील अनेक भागात काही दिवसापासून पथदिवे दिवसाही सुरूच राहत असल्याचे दिसून येत आहे. खांबावरील टायमर स्वीच खराब झाल्याने पथदिवे तसेच सुरू राहत आहेत. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देऊन पथदिवे वेळेवर सुरू व बंद करण्याची मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
बीडमध्ये पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम
बीड : येथे महाराणा प्रतापसिंह यांच्या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. शहरातील नवा पूल भागातील यशवंतराव चव्हाण उद्यान परिसरातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राहुल बुंदेले, ओम बुंदेले, साहिल राजपूत, मोनू ठाकूर यांची उपस्थिती होती.