रस्ता दुरूस्त करा
बीड : आष्टी तालुक्यातील बेलगाव येथील खोटेवस्तीवर जाणाऱ्या अंतर्गत रस्त्याची पावसाने दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. याबाबत अद्यापही लक्ष दिले जात नाही. लवकरात लवकर दुरूस्तीची मागणी केली जात आहे.
इंटरनेट सेवा विस्कळीत
पाटोदा : मागील काही दिवसांपासून पाटोदा शहरात बीएसएनएलची इंटरनेट सेवा विस्कळीत झाली आहे. इंटरनेटला स्पीड मिळत नसल्याने ग्राहक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडे अनेक ग्राहकांनी तक्रारी केल्या; परंतु याची दखल घेतली जात नसल्याचे दिसते.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसारात कलह वाढत चालले आहेत.
बस सुरू करा
अंबाजोगाई : तालुक्यात ग्रामीण भागातील बससेवा अजूनही पूर्ववत सुरू झाली नाही. बस सुरू न झाल्याने प्रवाशांना रिक्षा व इतर वाहनांतून प्रवास करावा लागतो. ग्रामीण भागात बस सुरू करण्याची मागणी होत आहे.