मास्कच्या वापराचा नागरिकांना विसर
अंबाजोगाई : एस. टी. बस आता पूर्ण प्रवासी क्षमतेने धावू लागली असली तरी बसमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना होत नसल्याने कोरोनाच्या फैलावाची शक्यता नाकारता येत नाही. प्रवाशांनाही कोरोनाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे.
रोहयोची कामे ठप्प; काम देण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात शेतीचा हंगाम संपत आला आहे. आता रोजगार निर्मिती उपलब्ध होणार नाही. शेतीतील कामेही संपुष्टात आल्याने शेतमजूर कामाच्या शोधात आहेत. अशा स्थितीत शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून गाव रस्ते, शिवरस्ते यांची कामे सुरू केली तर शेतमजुरांना गावातच काम उपलब्ध होईल. रोजगाराची उपलब्धी होऊ शकते.
पांदण रस्त्याची मागणी
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथील शेतात जाण्यासाठी असलेल्या पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वेळोवेळी मागणी करूनदेखील या रस्त्याची दुरुस्ती करण्यात येत नाही. त्यामुळे शेतात जाताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. पंचायत समितीने यामध्ये लक्ष घालून रस्ता करावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
महामार्गाचे काम अपूर्ण
नेकनूर : बीड तालुक्यातील नेकनूर मार्गे मांजरसुंबा ते केज या राज्य महामार्गाचे काम अनेक ठिकाणी अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याकडेला असलेल्या साहित्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. त्यामुळे अनेकवेळा महामार्गावरील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासंदर्भात नागरिकांनी मागणी केली आहे.
चांगल्या पावसामुळे चाऱ्याची मुबलकता
बीड : दुष्काळी परिस्थितीमुळे मागील काही वर्षांत चाऱ्याची कमतरता बीड जिल्ह्यात भासली होती. मात्र, दोन वर्षांपासून पाऊस चांगला झाल्यामुळे चारा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटला असून, चार छावण्यांची आवश्यकता भासणार नाही. दरम्यान, ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे कडबा उपलब्ध असणार आहे.