त्रासदायक झुडपे काढण्याची मागणी
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किमी रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहन चालकांनी केली आहे.
लघू व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न गंभीर
केज : शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला ज्यांच्या मालकीच्या जागा आहेत, त्यांच्या मर्जीनुसार भाडे देऊन जागा किरायाने घ्यावी लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी रस्त्याचे खोदकाम केल्याने अनेकांना त्यांचे व्यवसाय जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.
व्यावसायिकांकडून नियमांची पायमल्ली
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. या प्रकरणी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे, परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
सुविधांअभावी खवा उद्योग अडचणीत
अंबेजोगाई : खवा व्यावसायिकांना शासनाकडून सोईसुविधा, तसेच सवलती शासनाकडून मिळतात. मात्र, तालुकास्तरावर खवा व्यावसायिक या संदर्भात अनभिज्ञ आहेत. नवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. भट्ट्यांऐवजी मशीनद्वारे खव्याची निर्मिती होती. मात्र, ही मशिनरी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभाग शेतकऱ्यांना न्याय देत नसल्याने शेतकऱ्यांसमोर अनेक अडचणी निर्माण होतात. परिणामी, जुन्याच भट्ट्यांवर खवा उद्योग सुरू असल्याने मोठ्या प्रमाणात इंधन वापरले जाते.