केज : केज पोलीस ठाणे हद्दीत चोरीचे व दरोड्याचे प्रमाण काही महिन्यांत वाढले आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढविण्याची मागणी होत असून, दाखल गुन्ह्यांचा छडा तातडीने लावावा व चोरट्यांना ताब्यात घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
वाळू उपसा थांबवावा; नागरिकांची मागणी
गेवराई : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर महसूलदेखील बुडत आहे. संबंधितांवर कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
नाल्यांची सफाई नाही
बीड : शहरातील पांगरी रोड, सहयोगनगर, जिजामाता चौक, मोंढा रोड, सुभाष रोड, माळी वेस, दत्तनगर, धोंडीपुरा, कारंजा रोड या भागातील नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही, कचराही ठिकठिकाणी साचलेला दिसतो. अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल धरून चालावे लागत आहे. पालिकेने विशेष मोहीम राबवून स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.
पारदर्शक पाइप बसवा
तेलगाव : अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनाच्या टाकीमध्ये पेट्रोल न टाकता नागरिकांची फसवणूक केली जाते. पेट्रोल टाकत असताना ते आपल्या टाकीत पडते का, हे नागरिकांना दिसावे, यासाठी पेट्रोल भरण्यासाठी असलेला पाइप पारदर्शक असावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
अवैध दारू विक्री
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखाबंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसार उघड्यावर आले असून व्यसनाधीनतेमुळे कुटुंबातील कलह वाढत चालले आहेत.