पुरूषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील ढोरगाव येथील शेतकऱ्याने अनुभव नसताना प्रथमच तीन एकर शेतात टरबुजाचे पीक घेतले. चांगल्या प्रतीचे फळ असल्याने या टरबुजाला हैदराबादसह कोलकताच्या बाजारपेठेत किलोमागे साडेआठ रूपयांपेक्षा जास्त भाव मिळाला.
खामगाव - पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर माजलगावपासून चार किलोमीटर अंतरावर व धरणाच्या भिंती शेजारी ढोरगाव शिवारात डॉ. सदाशिव सरवदे यांचे १० एकर शेत असून याठिकाणी
बोअरच्या पाण्यावर आतापर्यंत ऊस , कापूस , गहू , हरभरा ,ऊस तसेच इतर पिके घेतली होती. ही पिके घेत असताना फायदा कमी आणि तोटा जास्त सहन करावा लागला होता. त्यामुळे सरवदे यांनी कापूस मोडून त्या जागेवर तीन एकर प्रथमच टरबुजाचे पीक घेतले. यात या शेतकऱ्याला ८५ हजार रुपये खर्च आला होता. त्यामुळे या शेतकऱ्यास ३ लाख १५ हजार रुपये निव्वळ नफा मिळाला.
दरवर्षी वादळ , वारे ,गारा पडल्यास टरबुजाला मोठा फटका बसत असे. परंतु माजलगाव तालुक्यात वादळ ,वारे व गारा न पडल्याने यावर्षी टरबुजाला फटका बसला नाही. यामुळे ज्या शेतकऱ्यांनी टरबूज केले त्यांना भाव चांगला मिळून शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळाले.
प्रथमच धाडस केेले
मी यापूर्वी टरबुजाचे पीक घेतले नव्हते. हे पीक घेण्यापूर्वी अनेकांनी भीती दाखवली होती. परंतु धाडस करून तीन एकर टरबूज लागवड केली व कमी वेळेत चांगले उत्पन्न मिळाले.
--डॉ. सदाशिव सरवदे ,टरबूज उत्पादक शेतकरी ,ढोरगाव
गोड, चवदार अन् वजनदार
लागवडीनंतर दोन अडीच महिन्यात वेलीला चांगली फळे बहरली. ही फळे खायला गोड व चविष्ट तसेच ७-८ किलोपर्यंत या फळाचे भरत असल्याने याला घेण्यासाठी भरपूर दलाल येऊन गेले. या टरबुजाला शेतात किलोला साडेआठ रूपये भाव मिळाला. यामुळे केवळ तीन महिन्यात तीन एकर शेतात टरबुजातून चार लाख रूपयांचे उत्पन्न या शेतकऱ्याच्या हातात पडले.
===Photopath===
260521\26bed_3_26052021_14.jpg~260521\26bed_2_26052021_14.jpg~260521\26bed_1_26052021_14.jpg