चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने भीती
वडवणी : शहरातील हद्दवाढ झालेल्या भागात चोऱ्यांचे प्रमाणात वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात पोलिसांनी गस्त वाढवून चोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
बसस्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानक परिसरात पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते. तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बसस्थानकात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
काटेरी झुडपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० किलोमीटर रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान व झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. ही झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे.
मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष
पाटोदा : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. कोरोना संसर्ग वाढत असतानाही नागरिक विनामास्क बिनधास्त वावरत आहेत. नागरिकांनी सक्तीने मास्कचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.
हातगाडे रस्त्यावर; वाहतुकीला त्रास
अंबाजोगाई : शहरात शिवाजी चौक, सावरकर चौक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या मुख्य रस्त्यावर हातगाडे लावण्यात येत असल्याने वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. हातगाडे पाठीमागे सरकून लावण्यासाठी कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.