---------
बेशिस्त वाहनांमुळे वाहतुकीचा खोळंबा
अंबाजोगाई : शहरात सावरकर चौक, प्रशांतनगर, शिवाजी चौक या भागात असणाऱ्या चहाच्या टपऱ्यांसमोर चहा पिण्यासाठी आलेले ग्राहक आपल्या दुचाकी गाड्या बिनधास्त रस्त्यावर लावून टपऱ्यांवर चहा पित बसतात. गाड्या रस्त्यावर लावण्यात येत असल्याने वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. बेशिस्त पार्किंग, समोर असणारे हातगाडे यामुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते.
----------
चोरीच्या घटना वाढल्या
अंबाजोगाई : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून लहान-मोठ्या चोऱ्यांच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबे घराला कुलूप लावून गेल्याने चोरट्यांना आयतेच रान मिळाले. परिणामी घरफोड्या वाढल्या. तसेच दुचाकीची शहरात मोठ्या प्रमाणात चोरी वाढली आहे. या वाढत्या चोऱ्यांचा पोलीस प्रशासनाने बंदोबस्त करावा. रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
-----------
फवारणीला आला वेग
अंबाजोगाई : पाऊस, आभाळ व वातावरणातील बदलांमुळे तूर, हरभरा या पिकांवर अळ्यांचे आक्रमण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अचानकच आळ्यांच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना तूर व हरभरा पिकांची फवारणी करणे क्रमप्राप्त झाले आहे. अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात सध्या फवारणीच्या कामाला मोठ्या प्रमाणात वेग आला आहे. कृषी विभागाने कोणते औषध फवारावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.
---------
गॅस सिलिंडरची नियमबाह्य वाहतूक
अंबाजोगाई : घरगुती तथा व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरचा अंबाजोगाई तालुक्यात काही लोकांनी गोरखधंदा सुरू केला आहे. अंबाजोगाई शहरातून स्वत:च्या नावावर गॅस घेऊन त्या सिलिंडरची विक्री चढ्या भावाने व्यावसायिकांना केली जाते. हा प्रकार सातत्याने सुरू आहे. हे सिलिंडर प्रवास करणाऱ्या ऑटोद्वारे इतरत्र नेऊन विकली जातात. पुरवठा विभागाने या प्रकाराकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
----------
मंडीबाजारात घाणीचे साम्राज्य
अंबाजोगाई : शहरातील मंडीबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. दररोज सकाळी विक्रीसाठी येणारा भाजीपाला विक्री झाल्यानंतर उरलेल्या भाज्या तिथेच रस्त्यावर टाकल्या जातात. या भाज्या खाण्यासाठी मोकाट जनावरे मंडीबाजारात असतात. रस्त्यावर पडलेल्या या भाज्यांमुळे दुर्गंधी व माशा बसून मोठ्या प्रमाणात घाण तयार होते. या परिसरात स्वच्छता ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
-------