धारूर शहर व तालुक्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने धारूर येथे ३ एप्रिलपासून ४० खाटाचे कोविड केअर सेंटर सुरू केले. मात्र हे सेंटर अपुरे पडणार हे सुरुवातीलाच लक्षात आले होते. येथे असणारी कोविड केअर सेंटरची इमारत ही चांगल्या ठिकाणी व सर्व व्यवस्था असलेली आहे. या ठिकाणी खाटांची संख्या अगोदरच जास्त मंजूर करणे आवश्यक होते. तेवढ्या प्रमाणात येथे कर्मचारीही नियुक्त करणे आवश्यक होते. मात्र तसे झाले नाही. जिल्ह्यात सर्वात उशिरा येथील कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. तेही फक्त ४० खाटांचे आहे. रूग्णांची संख्या मात्र मंजूर संख्येपेक्षा जास्त आहे. अपुऱ्या मनुष्यबळाअभावी कोविड रुग्णांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने सर्व बाबींचा विचार करून कोविड सेंटरमध्ये तत्काळ वाढीव १०० खाटांना मंजुरी देऊन आवश्यक कर्मचारी येथे नियुक्त करावेत अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
धारूरच्या कोविड सेंटरमध्ये खाटा वाढविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2021 4:34 AM