: मराठवाडा विकास मंडळास मुदत वाढ द्यावी तसेच नगर - बीड - परळी रेल्वे मार्गाच्या कामाची गती वाढवावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठवाडा विकास मंडळाची मुदत एप्रिल २०२० मध्ये संपली आहे. मराठवाड्याचा विकास इतर भागाच्या तुलनेत अद्याप झालेला नाही. शिक्षण, सिंचन, आरोग्य व रस्ते आदींबाबत मराठवाडा खूपच मागे आहे. याकरिता मराठवाडा विकास मंडळास त्वरित मुदत वाढ द्यावी तसेच नगर - बीड - परळी रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण १९९७ - ९८मध्ये होऊन या रेल्वेमार्गाला मंजुरी देण्यात आली. एकूण २६२ किलोमीटरचा हा रेल्वेमार्ग आहे. राज्य आणि केंद्र सरकार यांच्या संयुक्त भागीदारीत हा रेल्वे मार्ग आहे. पण अद्याप या रेल्वेमार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. रेल्वेमार्गाचे काम कासवगतीने सुरू असल्याने बीडकरांचे रेल्वेचे स्वप्न लांबणीवर पडत आहे. त्यामुळे नगर - बीड - परळी रेल्वेमार्गाच्या कामाची गती वाढवून लवकर हे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे. बुधवारी यासंदर्भात मराठवाडा जनता विकास परिषदेचे प्रमुख मार्गदर्शक माजी शिक्षक आ. डी. के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार वैशाली पाटील यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर माजी आ. डी. के. देशमुख, अध्यक्ष सुहास देशमुख, बीड जिल्हा सचिव सुमंत गायकवाड, शिरीष देशमुख, प्रा. पी. के. देशमुख, आर. एस. शिवणकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.