बीड : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागेवरील वंचित दुर्बल घटकातील मुलामुलींसाठीची मोफत प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्यास २१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आतापर्यंत बीड जिल्ह्यात दोन हजार ५५७ अर्ज दाखल झाले आहेत. परंतु, राज्यात कोरोनाचे संकट वाढत असल्याकारणाने काही जिल्ह्यांत संचारबंदी तसेच अन्य काही निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच आरटीई पोर्टलला ओटीपीसंदर्भात अडचण आली असली, तरी अर्ज भरतेवेळी पोर्टलवर युजर आयडी व पासवर्ड देण्याची सुविधा करण्यात आली होती. मात्र, बऱ्याचशा पालकांना यासंदर्भात माहिती नसल्याने ते अर्ज दाखल करू शकले नाहीत. त्यामुळे पालकांना अर्ज दाखल करण्यास मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्रामचे युवा नेते तथा आरटीई कार्यकर्ते मनोज जाधव यांनी राज्याचे शिक्षण संचालक यांच्याकडे केली आहे.
दिव्यांगांना आरटीई प्रवेशात चार टक्के आरक्षण
आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविताना दरवर्षी नवनवीन बदल करण्यात येतात. यंदा पहिल्यांदाच आरटीई प्रवेश प्रक्रियेत दिव्यांग विद्यार्थ्यांना चार टक्के आरक्षण देण्यात आले आहे. हे आरक्षण या वर्षापासूनच लागू होणार आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाच्या संचालकांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे अपंग विद्यार्थ्यांना आता आरटीई प्रवेशात हक्काच्या जागा मिळणार आहेत. या निर्णयाचे स्वागत होत आहे.