------------
कर्मचाऱ्यांचे अप-डाऊन संसर्गास कारणीभूत
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात शासकीय सेवेत असणारे ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, वीज तंत्रज्ञ, आरोग्य कर्मचारी हे सातत्याने विविध गावांहून नोकरीच्या गावामध्ये अप-डाऊन करत असतात. या कर्मचाऱ्यांच्या अप-डाऊनमुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका वाढतो की काय? अशी भीती ग्रामस्थांमध्ये आहे. तर कर्मचारीही कोरोनाचे कारण पुढे करून ग्रामीण भागात जाण्याचे टाळत आहेत.
-----------
पानटपऱ्यांमध्ये पेट्रोलची विक्री
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागामध्ये असलेल्या पानटपऱ्या व विविध दुकांनामध्ये पेट्रोलची खुलेआम विक्री केली जाते. तालुक्याच्या ठिकाणाहून अथवा जवळ असलेल्या पेट्रोलपंपावरून मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणले जाते व या पेट्रोलमध्ये भेसळ करून एक लीटरची बाटली किमान शंभर रुपये ते १२० रुपये या वाढीव दराने विकली जाते. पेट्रोल विकण्याची परवानगी फक्त पेट्रोलपंपधारकांनाच आहे. तरीही ग्राहकांची कोंडी ओळखून पेट्रोलची खुलेआम विक्री सुरूच आहे.
---------
बसचे वेळापत्रक कोलमडले
अंबाजोगाई : अंबाजोगाई आगारातून जवळपास २००पेक्षा जास्त बसफेऱ्या होतात. मात्र, खराब झालेले रस्ते व विविध कारणांमुळे बसचे वेळापत्रक मोठ्या प्रमाणात कोलमडले आहे. ज्या गावाला जाण्यासाठी प्रवासी येतात, त्या गावाला जाण्यासाठी त्यांना किमान अर्धा ते एक तास बसस्थानकावर गर्दीच्या ठिकाणी ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे बस वेळेवर धावल्या तर प्रवाशांचा मोठा त्रास कमी होईल. यासाठी वेळापत्रकानुसार बस सोडाव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास कानसुरकर यांनी केली आहे.
---------
अस्वच्छतेमुळे डासांचा प्रादुर्भाव
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी नालेही मोठ्या प्रमाणात तुंबलेले आहेत. नाल्यांची स्वच्छता सातत्याने होत नसल्याने नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घाण साठली आहे. त्यामुळे दुर्गंधीसोबतच डासांचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाने शहराची स्वच्छता करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.
------------
फास्ट फूडमुळे आजारांना निमंत्रण
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात फास्ट फूडचे फॅड वाढले आहे. तालुक्यात व शहरात ठिकठिकाणी वडापाव, पॅटीस असे अनेक खाद्यपदार्थांचे गाडे रस्त्यावर व रस्त्याच्या बाजूला उभे आहेत. या गाड्यांच्या बाजूला साठलेला कचरा, बाजूने वाहणारे नाले यामुळे मोठी अस्वच्छता असते. या उघड्यावरील फास्ट फूडमुळे नागरिकांना पोटाचे विकारही जडले आहेत. याठिकाणी स्वच्छतेबाबत दक्षता बाळगण्याची मागणी होत आहे.
-----------
आशा सेविकांना सुरक्षा किट देण्याची मागणी
अंबाजोगाई : कोरोना विषाणूंच्या संसर्गापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी आशासेविका गेल्या आठ महिन्यांपासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. घरोघरी जाऊन रुग्णांचे सर्वेक्षण करणे, बाहेरगावाहून आलेल्या ग्रामस्थांची यादी शासनाला देणे, आरोग्याबाबत जनजागृती करणे, तसेच रुग्णांचे सर्वेक्षण करण्याचे काम त्या करत आहेत. हे काम करताना त्यांना सुरक्षा किट दिलेले नसल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना सुरक्षा किट उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
--------