विद्युत खांब गंजले
अंबेजोगाई : अंबेजोगाई शहरातील व तालुक्यातील विविध गावांतील विद्युत खांब गंजले आहेत. मागील अनेक वर्षांपूर्वी हे खांब बसविण्यात आल्यानंतर, याकडे महावितरण विभागाने लक्ष दिले नाही. सध्या गावातील बरेच खांब गंजून गेले आहेत. यामुळे कधी कोणता खांब पडेल, हे सांगणे अवघड झाले आहे. या विद्युत खांबावरील तारांतून सदैव वीजप्रवाह होतो. त्यामुळे एखादा खांब पडून, त्याचा लोकांशी संपर्क झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
ढगाळ वातावरणामुळे रोगांचा प्रादुर्भाव
अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून ढगाळ वातावरण असल्याने, भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भाजीपाला पिकांचे नुकसान होत आहे. ऐन भाजीपाला काढण्याच्या वेळी कीटक व अळ्यांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, शेतकरी चिंतेत दिसून येत आहे.
लॉकडाऊनच्या निर्णयाने चिंता
अंबेजोगाई : जिल्ह्यात सायंकाळी चारपर्यंत व्यवहार सुरू ठेवण्याचे आदेश दिल्याने, रस्त्यालगत विविध व्यवसाय करणारे व्यावसायिक चिंतेत आहेत. वेळेआधीच व्यवसाय आटोपावा लागणार असल्याने रोजगारावर परिणाम होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
साइडपट्ट्या खचल्या
अंबेजोगाई : अंबेजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून अनेक कामे झाली. मात्र, या मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या साइडपट्ट्या ठिकठिकाणी खचल्या आहेत. त्यामुळे अपघात होत आहेत. खचलेल्या साइडपट्ट्यांवरून दुचाकी वाहने जात असताना, वाहन चालकाचा तोल जाऊन अपघात होत आहेत.
कोरोनामुळे विकासाची गती मंदावली
अंबेजोगाई : गावचा विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत असलेले प्रमुख माध्यम मालमत्ता, पाणी व दिवाबत्ती कर जमा होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, मार्च महिन्यापासून आजपर्यंत नऊ महिन्यांचा कालावधी संपला असून, कराची रक्कम ग्रामपंचायतीला कोरोनाच्या प्रभावामुळे वसूल करता आली नाही. त्यामुळे गाव विकासाची घडी विस्कटल्याचे चित्र आहे.
मुख्यालयी राहण्याची सक्ती करा
अंबेजोगाई : ग्रामीण भागात सेवा देणारे तलाठी व ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने शेतकरी व नागरिकांना विविध कामासाठी तालुक्याला यावे लागत आहे. कोरोनाच्या काळात तलाठी व ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने मजुरांचे विलगीकरण, तसेच शेतकऱ्यांची काम करणे आदी सेवांचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहणे सक्तीचे करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.