पाटोदा : तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी शासनाच्या वतीने गावोगावी हातपंप बसविण्यात आले. पूर्वी या हातपंपावर संपूर्ण गावाला पाणी मिळत असे. मात्र, आता गावोगावी पाणी पुरवठा योजना झाल्याने हातपंप नादुरुस्त अवस्थेत आहेत. भारनियमनाच्या कालावधीत आजही अनेक गावांना हातपंपांचा आधार मिळतो. त्यामुळे नादुरुस्त हातपंप दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
अंबाजोगाई शहरात पदपथावर आक्रमण
अंबाजोगाई : शहरात मुख्य रस्त्याच्या बाजूला फुटपाथ सोडण्यात आले आहेत. मात्र, या फुटपाथवर छोट्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे नागरिकांना फुटपाथवरून जाताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
दुचाकी चोऱ्या वाढल्या
माजलगाव : शहरातील प्रमुख भागातील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरी गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना शोध लागत नसल्याचे चित्र आहे.
ज्वारी, हरभऱ्याला पाणी
शिरूर कासार : सध्या शेतकरी ज्वारी व हरभऱ्याला पाणी देण्यात व्यस्त आहे. विहिरींना, बोअरला पाणी भरपूर आहे. मात्र विजेच्या धरसोडीमुळे रात्री-अपरात्री शेतकरी जीव धोक्यात घालून पिकाला पाणी देतोय. परंतु दिवसा वीज मिळत नसल्याचे चित्र आहे.
वाहतुकीची कोंडी
गेवराई : शहरातून जाणाऱ्या धुळे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूंनी अतिक्रमण, छोटी दुकाने असल्याने तसेच रस्त्यापर्यंत विक्रेते हातगाडे उभे करीत असल्याने अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. या हातगाडे चालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
बांधकाम साहित्य रस्त्यावरच
बीड : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकाम करताना लागणारे वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासीयांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो.
नद्यातून वाळू उपसा
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे.