केज ; कृषी दुकानात खते उपलब्ध नसल्याचे सांगून कंपनीने ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने शेतकऱ्यांना खतांची विक्री केली जात आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र चालकांना सद्यस्थितीत त्यांच्या दुकानात खतांचा किती साठा (स्टाॅक) आहे, याची माहिती समजण्यासाठी दुकानाच्या पुढेच उपलब्ध साठा दर्शविणारा फलक लावण्याची सक्ती करावी, अशी मागणी शिवसेना तालुका उपप्रमुख विकास काशिद यांनी
तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांना खते-बियाणे खरेदी करणे गरजेचे आहे. मात्र कृषी सेवा केंद्र चालक जाणीवपूर्वक तुटवडा असल्याचे कारण सांगून शासनाने ठरवून दिलेल्या (एमआरपी) किमतीपेक्षा जास्त भावाने शेतकऱ्यांना खत विक्री करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने चढ्या
दराने खते-बियाणे खरेदी करावे लागत आहेत. अशा रीतीने शेतकऱ्यांची होणारी आर्थिक लूट
थांबविण्यासाठी कृषी दुकानदारांकडे असलेला खते-बियाणांचा उपलब्ध साठा फलक दुकानाबाहेर लावण्याचे आदेश द्यावेत. ज्यामुळे खतांचा तुटवडा भासवून जादा दराने होणाऱ्या विक्रीवर नियंत्रण ठेवता येईल. या मागणीचे निवेदन शिवसेनेचे तालुका उपप्रमुख व तालुका समन्वयक व पुनर्विलोकन समितीचे सदस्य विकास काशिद यांनी नायब तहसीलदार लक्ष्मण धस यांना दिले आहे.