केज : बीड येथे चार वर्षांपूर्वी जिल्हा माहिती अधिकारी असलेले ज्ञानेश्वर इगवे यांचे फेसबुक मेसेंजर हॅक करीत त्यांच्या नावाने त्यांच्या फेसबुक मित्रांना मेसेंजरवर संदेश पाठवीत पैशांची मागणी करण्यात आली. याप्रकरणी इगवे यांच्याशी संपर्क साधून त्यांना याबाबत विचारणा केली असता, त्यांनी आपले फेसबुक मेसेंजर हॅक करून अनेक मित्रांना असे संदेश पाठविण्यात आले असल्याची माहिती देत सायबर क्राइममध्ये या बाबतीत गुन्हा दाखल केला आहे.
बीड येथे चार वर्षांपूर्वी ज्ञानेश्वर इगवे हे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून बीडमध्ये कार्यरत होते. ते आता मुंबई येथे सेवेत आहेत. १ एप्रिल रोजी रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या फेसबुक मेसेंजर खात्यातून केज येथील डी. डी. बनसोडे यांना कसे आहात, सध्या कुठे आहात, गुगल पे वापरता का आणि खात्यावर किती पैसे आहेत असतील तर १५ हजार रुपये पाठवा, कारण मित्राचा अपघात झाला आहे. दवाखान्यात पैसे भरायचे असल्याने अर्जंट पैसे पाठवा म्हणून विनंती केली. मात्र, तेवढे पैसे नाहीत म्हटल्यानंतर किमान ३ हजार रुपये तरी पाठवा म्हणून गुगल पेचा नंबरही पाठवला. मात्र बनसोडे यांना शंका आली. त्यामुळे बनसोडे यांनी इगवे यांच्याशी संपर्क साधला असता इतर लोकांनाही माझ्या नावाने असेच मेसेज गेले असून, माझे फेसबुक हॅक केले असल्याचे त्यांनी सांगितले व त्यांनी ते फेसबुक अकाउंट तात्काळ बंद करीत मुंबई सायबर क्राइमच्या अधिकाऱ्यांशी बोलून ऑनलाइन तक्रारही दाखल केली. जवळच्या व्यक्तीने अशा प्रकारे पैशाची मागणी केली, अथवा इतर काही माहिती विचारली तर खात्री करूनच व्यवहार करावा अथवा तात्काळ पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन ज्ञानेश्वर इगवे यांनी केले आहे.