...
शहर स्वच्छतेकडे पालिकेचे लक्ष
अंबेजोगाई : शहरातील विविध भागांत दैनंदिन सकाळच्या सुमारास घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे ओला व सुका कचरा संकलित केला जात आहे. या माध्यमातून स्थानिक नगरपरिषदेने शहर स्वच्छतेकडे विशेष लक्ष पुरविणे सुरू केले आहे. या उपक्रमाप्रती नागरिकांतून पालिकेचे कौतुक होत आहे.
----------------------------------------
बाजारपेठेत गर्दी न करण्याचे आवाहन
अंबेजोगाई : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आता नियंत्रणात आहे. मात्र, तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत असून, नागरिकांनी नियमांचे पालन करावे. बाजारपेठेत अनावश्यक गर्दी करू नये, आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी केले आहे.
---------------------------------------
रस्ते दुरुस्त करण्याची मागणी
अंबेजोगाई : शहरातील अंतर्गत रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले असून, वाहन चालकांची गैरसोय होत आहे. स्थानिक नगरपालिकेने या समस्येकडे लक्ष पुरवून अंतर्गत मुख्य रस्त्यांची विनाविलंब दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरीत आहे.
-------------------------------------
सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची तपासणी
अंबाजोगाई : सर्दी, खोकला, ताप आदी आजार असलेल्या रुग्णांवर वेळीच उपचार व्हावेत, म्हणून अंबेजोगाई तालुका आरोग्य विभागाने मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गत ग्रामीण भागात अनेक रुग्णांची तपासणी करण्यात आली. यावेळी अनेकांनी यांचा लाभ घेतला.