बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. एवढेच नव्हे, तर ऑक्सिजन पुरवठा करणारे सिलिंडरदेखील कमी पडत आहेत. हाच धागा पकडून एक हजार जंबो सिलिंडरसह पोर्टा व ड्यूरा नावाच्या सिलिंडरची मागणी शासनाकडे करण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातील बहुतांश रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. तो उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासन धावपळ करीत आहे. ऑक्सिजनची निर्मिती होत असली तरी तो ऑक्सिजन साठवायला अथवा रुग्णालयात पोहोचवायला सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. हाच धागा पकडून आरोग्य विभागाने शासनाकडे रिकाम्या सिलिंडरची मागणी केली आहे. यातील पोर्टा नामक सिलिंडर आले असून, ते लोखंडीला देण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते यांनी ही माहिती दिली.
काय आहे पोर्टा आणि ड्यूरा?
२२ जंबो सिलिंडरचे मिळून एक ड्यूरा सिलिंडर तयार होते. असे ३० सिलिंडर मागविले आहेत. तसेच १०० सिलिंडरचे मिळून एक असलेल्या सिलिंडरला पोर्टा सिलिंडर म्हणतात. असे पाच मागविले आहेत. आलेले एक पोर्टा सिलिंडर लोखंडी सावरगावला दिले आहे.