सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृहे बांधा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अनेक वर्दळीच्या ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने जनतेने स्वतःहून काही ठिकाणी अघोषित स्वच्छतागृहे तयार केली आहेत. त्यामुळे जवळपासचे दुकानदार व घरमालक कमालीचे त्रस्त आहेत. नगरपालिकेने शहरातील मुख्य ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह बांधण्याची गरज आहे. पावसाळ्यात या ठिकाणी मोठी दुर्गंधी येत असते. त्यामुळे व्यवस्था करणे गरजेचे आहे.
अनेक कार्यालयातील बॉयोमेट्रिक बंद
अंबाजोगाई : अंबाजोगाई उपविभागातील अनेक शासकीय कार्यालयातील बॉयोमेट्रिक मशीन बंद आहेत. याचाच फायदा घेत कर्मचारी व अधिकारी नियमित वेळी उपस्थित राहत नसल्याचे बघायला मिळत आहे. आता कोरोनाचे संकट असल्याने कर्मचाऱ्यांना ताण पडत आहे. परंतु, काही कर्मचारी गैरफायदा घेत असल्याचे दिसून येत आहे
लाभार्थ्यांना लाभ देण्याची मागणी
अंबाजोगाई : श्रावणबाळ योजना, राजीव गांधी निराधार योजना, संजय गांधी निराधार योजना अशा योजनेंतर्गत वृद्धांना मानधन देण्यात येते. मात्र, या योजनांचा लाभ घेताना वृद्धांना खूप अडचणी जाणवतात. पैसे जमा करण्याची निश्चित तारीख माहीत नसल्यामुळे बँकेभोवती चकरा माराव्या लागतात. तासनतास रांगेत उभे रहावे लागते. यामुळे शासनाने यात नियमितता ठेवण्याची मागणी करण्यात येत आहे. आता लॉकडाऊन सुरू असल्याने या योजनांचा तत्काळ लाभ देण्यात यावा, अशी मागणी आहे.