बीड : बीड बायपासचे काम पूर्णत्वास गेलेले असताना लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. बीड शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याचे काम होणे अपेक्षित असताना, याकडे कानाडोळा असल्याचे दिसते. दर्जेदार रस्ते करून सुविधा द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
तहसील कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
गेवराई : सामान्यांची कामे तातडीने व्हावीत, त्यांना कसल्याहीप्रकारचा त्रास होऊ नये, याची दक्षता जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येते. मात्र, गेवराई तहसील कार्यालयात दलालांची मोठी गर्दी वाढल्याने सामान्यांना साध्या कामासाठीही हेलपाटे मारावे लागतात. एखादे प्रमाणपत्र काढण्यासाठी गेले, तर कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात.
आवास योजनेचे काम संथगतीने सुरू
पाटोदा : केंद्र व राज्य शासनाच्या विविध आवास तथा घरकुल योजनांचे काम संथ गतीने सुरू आहे. कामांना गती देण्यासाठी लाभार्थ्यांची नोंदणी सक्षम पद्धतीने करावी, अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे या चांगल्या योजनेपासून वंचित लाभार्थ्यांना योग्य न्याय द्यावा, अशी मागणी हेात आहे.
स्वच्छतागृहाची दुर्दशा, महिला प्रवासी त्रस्त
वडवणी : येथील बसस्थानकात असलेल्या स्वच्छतागृहाची दुर्दशा झाली आहे. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांची गैरसोय होत आहे. शौचालयात असुविधा असल्यामुळे महिलांची कुचंबणा होत आहे. आगारप्रमुखांनी लक्ष देत स्वच्छतागृहाची दुरूस्ती करून गैरसोय दूर करण्याची मागणी आहे.