रस्त्यावरील वाहने वाहतुकीला अडथळा
पाटोदा : शहरातील विविध बँकांसह सार्वजनिक ठिकाणी दुचाकींची अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, वाहनकोंडी होत आहे. काही वेळा वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे कारवाया करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
साहित्यामुळे अडथळा
अंबाजोगाई : शहरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध बांधकामाचे साहित्य पडलेले असते. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा होत आहे. परिणामी, लहान-मोठ्या अपघातांमध्येही वाढ झाली आहे. साहित्य योग्य प्रकारे ठेवण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
अवैध धंदे वाढले
बर्दापूर : गावापासून जवळच असलेल्या बर्दापूर फाट्यावर बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. हॉटेल, पान टपरी तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो, तसेच अवैधरीत्या दारुची विक्री होते. पोलीस प्रशासनाने यावर नियंत्रण आणण्याची मागणी आहे.
ग्रामीण ग्राहक वैतागले
माजलगाव : तालुक्यातील टाकरवण, तालखेड भागात काही दिवसांपासून इंटरनेट सेवा व्यवस्थित मिळत नसल्याने ग्राहकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तक्रारी करूनही संबंधितांनी दखल घेतलेली नाही. बीएसएनएलची लाइन बिघडल्याने इतर कंपन्यांच्या टॉवरची रेंज मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. महत्त्वपूर्ण कामे खोळंबत असल्याने ग्राहक वैतागलेले दिसून येत आहेत.
कर्णकर्कश हॉर्नचा त्रास
गेवराई : येथील उप जिल्हा रुग्णालय परिसरात वाहनचालक कर्णकर्कश हॉर्न वाजवीत असल्याने रुग्णांसह सर्वसामान्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक वेळा वाहनधारक नागरिकांच्या जवळ येऊन मोठे हॉर्न वाजवत असल्याने नागरिक मोठ्या आवाजाने दचकत आहेत. या वाहनचालकांवर कारवाईची मागणी आहे.