मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो; अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात. तसेच दोनपदरी आणि तीनपदरी मास्कचीही दुपटीपेक्षा अधिक दराने विक्री केली जाते. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होत आहे.
सात्रा, पोत्रा भागात वाळू उपसा
बीड : तालुक्यातील नेकनूर परिसरातील सात्रा, पोत्रा, चांदेगाव या नदीपात्रात वाळू तस्करांनी उच्छाद मांडला आहे. रात्रीच्या वेळी जेसीबीच्या साह्याने वाळूचा उपसा करून टिपरने व ट्रॅक्टरने वाहतूक केली जात आहे. याकडे महसूल विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने शासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग
अंबाजोगाई : उन्हाळी हंगामात शेतकरी प्रामुख्याने खरीप हंगामाची तयारी करतात. पेरणीपूर्वी शेतजमीन नांगरणे, कोळपणे, वेचणी करणे, बांधावर उगवलेली झाडे-झुडपे काढण्याची कामे सुरू आहेत. या सर्व कामांना वेग आला आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
माजलगाव : शहरातील विविध भागांत घाण साचली आहे. या घाणीची स्वच्छता होत नसल्यामुळे विविध आजारांचा प्रसार वाढला असून, नगर परिषदेने यंत्रणेमार्फत स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे.
सुट्ट्या नाण्यांचा तुटवडा
बीड : नोटाबंदीनंतर ग्रामीण भागात नाण्यांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. यावर अद्याप तोडगा निघाला नसल्याने आर्थिक व्यवहार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी चिल्लर मिळत नसल्याने ग्रामस्थांना वणवण भटकावे लागत आहे.
रॅकेट सक्रिय
माजलगाव : शहरातील प्रमुख भागांतील दुचाकी चोरी होण्याचे प्रमाण वाढले आहे. गाडी चोरीस गेल्यानंतर तक्रारी दाखल होतात. एफआयआर दाखल होतो. पोलिसांना चोरांचा माग लागत नसल्याचे चित्र आहे. या चोरींना आळा घालण्याची मागणी आहे.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखाबंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांच्या संसारात कलह वाढत चालले आहेत.
काकडीला मागणी
बीड : उन्हाळ्यात आहारामध्ये काकडीला महत्त्वपूर्ण स्थान दिले जाते. शरीराला थंडावा मिळत असल्याने काकडीच्या वापराकडे कल आहे. बाजारात काकडीची आवकही असल्याने भावही ८ ते १० रुपये किलो आहेत.