मास्कची चढ्या भावाने विक्री
अंबाजोगाई : शहरातील औषध दुकानांमध्ये एन-९५ मास्कची शासकीय दराने विक्री होत नाही. एक तर मास्कचा तुटवडा दाखवला जातो; अन्यथा ते चढ्या भावाने विकले जातात. तसेच दोनपदरी आणि तीनपदरी मास्क दुपटीपेक्षा अधिक दराने विकले जात आहेत. याचा मोठा फटका शहरवासीयांना सहन करावा लागतो. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात तर मास्कसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारले जातात. यामुळे सामान्य ग्राहकांची लुबाडणूक होत आहे.
खरीपपूर्व मशागतीच्या कामांना वेग
अंबाजोगाई : उन्हाळी हंगामात शेतकरी प्रामुख्याने खरीप हंगामाची तयारी करतात. पेरणीपूर्वी शेतजमीन नांगरणे, कोळपणे, वेचणी करणे, बांधावर उगवलेली झाडे-झुडपे काढणे आदी कामे सुरू आहेत. या सर्व कामांना वेग आला आहे.
थंडी, तापाचे रुग्ण वाढले
अंबाजोगाई : तालुक्यात आठवडाभरापासून ढगाळ वातावरण आहे. दोन वेळा पाऊस पडला. तर आता दररोज आभाळ भरून येते. त्यामुळे कधी ऊन, तर कधी पाऊस अशा वातावरणातील बदलामुळे थंडी, तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामुळे खासगी रुग्णालये हाऊस फुल्ल होत असून, उपचार करून घेण्यासाठी गर्दी करू लागल्याचे चित्र दिसत आहे.
कर्जवसुली थांबविण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे बाजारपेठ बंद आहे. सर्वसामान्य जनतेला रोजगार उपलब्ध नाही. त्यामुळे खेड्यापाड्यातील महिला बचत गटांना बँकांनी दिलेली कर्ज वसुली काही काळ थांबविण्यात यावी. या कालावधीतील व्याजदरही रद्द करावेत, अशी मागणी होत आहे.