बीड : मागील तेरा महिन्यांपासून पसरलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी रोगप्रतिकारकशक्ती महत्त्वाची आहे. ती वाढविण्यासाठी विविध औषधी वनस्पतींचा लोक वापर करू लागले आहेत. तुळस, अश्वगंधा, अद्रक, अमृता, पुदिना, गवती चहा, कोरफड, गुळवेल, शतावरी अशा वनस्पतींचा वापर वाढला आहे. या वनस्पती किंवा त्यापासून निर्मित औषधांना मागणी आहे. कडुनिंबाच्या सालीचा काढा, तसेच पाल्याचा रस घेण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. ताप, हाडांच्या वेदना, अशक्तपणा, भूक न लागणे अन्य त्रासांवर गुळवेल गुणकारी मानले जाते. एरव्ही लिंबाच्या झाडाकडे, तसेच त्यावरील गुळवेलीकडे दुर्लक्ष करणारे आता मात्र नजर ठेवून वापरात आणत आहेत.
बीडच्या बहुतांश नर्सरींमध्ये तुळशीच्या रोपांचा तुटवडा आहे. स्वत: नर्सरी चालक ही रोपे बनवितात. मात्र तीही संपत आली आहेत. पुणे, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरातमधून रोपे येतात. सध्या लॉकडाऊनमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. कोरोना असो वा नसो प्रतिकार शक्ती समृद्ध करण्यासाठी आणि कोरोनापासून बचाव करण्यासाठी औषधी रोपांची ग्राहक मागणी करतात; परंतु सध्या लॉकडाऊन व उन्हाळ्यामुळे रोपनिर्मिती घटली आहे. शोभेच्या फुलझाडांची रोपेही ग्राहक खरेदी करतात.
या रोपांना चांगली मागणी
पुदिना
चटणीत वापर केला जातो. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांवर गुणकारी. जिरा, लिंबू, पुदिना रस घेतल्यास करपट ढेकरांवर चांगला परिणाम होतो. पाचनक्रिया उत्तम ठेवतो. तोंडातून उग्र दर्प थांबविण्यासाठी, उल्टी रोखण्यासाठी पुदिनाचा रस उपयोगी ठरतो. जिरे, काळी मिरी, हिंग व पुदिना एकत्रित करून सेवन केल्यास पोटदुखीमध्ये आराम मिळतो.
अश्वगंधा
चरबी कमी करण्यासाठी, बल, वीर्य विकार चांगले करण्यासाठी अश्वगंधाचा वापर केला जातो. अश्वगंधा, आवळा मुळेठीचे मिश्रण डोळ्यांना विश्रांती देतात. गलगंड रोगात अश्वगंधा पावडर किंवा रस उपयोगी ठरते. अश्वगंधाचे चुर्ण क्षयरोगात उपयोगी ठरते. खोकला, कफच्या समस्येत कामी येते. छातीमध्ये दुखणे कमी होते.
अद्रक (आले)
सर्दी, ताप, खोकल्यावर आरोग्यवर्धक. तोंडात लाळेची निर्मिती करते. अपचनावर गुणकारी. रक्तातील चरबीची पातळी कमी होण्यास मदत मिळते. मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह झिंक सी, बी थ्री आणि बी सिक्स जीवनसत्त्व मिळत असल्याने, तसेच वातहारी असल्याने अद्रकला मागणी आहे.
तुळस
अनेक औषधी गुणधर्मांमुळे तुळशीला ‘क्वीन ऑफ हर्ब्स’ मानले जाते. तुळशीमधील अँटिऑक्सिडंटमुळे शरीराला फायदेशीर आहे. कॅन्सर, इन्फेक्शन, आळस, हदयरोग, ॲलर्जी, लठ्ठपणा, खोकला, त्वचारोग, दंतदुखी अशा अनेक त्रासांवर तुळस उपयुक्त मानली जाते. रक्तशुद्धीकरणासाठीही वापर केला जातो. तुळस घरात असल्याने ऑक्सिजनची कमतरता कधीच घरात जाणवत नाही.
गवती चहा
फंगल इन्फेक्शन टाळण्यासाठी गवती चहाचा फायदा होतो. रोगप्रतिकारकशक्ती वाढते. कामाची दगदग, धावपळ, डोकेदुखीवर गवती चहा उपयोगी असून, सांधेदुखी, गुडघेदुखीचा त्रास कमी होतो. शरीरातील टॉक्सिन बाहेर काढण्यास गवती चहा मदत करते. पोटॅशियम असल्याने रक्तदाब कमी करण्यास मदत होते. अ, ब, क, फोलेट, पोटॅशियम, कॅल्शियम मॅग्नेशियम झिंक, कॉपर, लोह मिळते.
------
मागील काही महिन्यांपासून तुळस, अश्वंगधा, पानफुटी, गवती चहाच्या राेपांना मागणी आहे. कोरोनात बरे वाटावे म्हणून गवती चहाचा वापर केला जातो. मूतखड्यावर गुणकारी म्हणून पानफुटी, तर चरबी कमी करण्यासाठी अश्वगंधाच्या रोपांना मागणी आहे, तसेच ऑक्सिजन देणारे पिंपळ, वड आणि कडुनिंबाच्या रोपांनाही चांगली मागणी आहे. - राजेंद्र पंडित, नर्सरी चालक
------------
तुळशीच्या रोपांना जास्त मागणी आहे; परंतु सध्या शिल्लक नाही. अश्वगंधा, पानफुटी, सताप, कोरफड, गवती चहाच्या रोपांना मागणी आहे. आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने, तसेच शरीरातील उष्णता कमी करण्यासह प्रतिकार वाढविणारी रोपे परसबागेत लावण्यासाठी ग्राहक खरेदी करतात. सध्या लॉकडाऊनमुळे लोक येत नसल्याने नर्सरी बंद आहे. -मनोज तळेकर, नर्सरी चालक.