अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण परिसरात दूरसंचारची सेवा सातत्याने विस्कळीत होत आहे. इंटरनेट सेवा सतत खंडित होत असल्याने अनेक शासकीय व निमशासकीय यंत्रणा ठप्प होते. त्यामुळे याचा मोठा त्रास ग्राहकांना सहन करावा लागत आहे. विस्कळीत सेवा सुरळीत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद कऱ्हाडे यांनी केली आहे.
ग्रामीण भागातील रस्ते डांबरीकरणाविना
अंबाजोगाई :अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात अनेक रस्त्यांची मोठी दुर्दशा झालेली आहे, तर अनेक गावांमधील गावांना जोडणारे रस्ते डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत आहेत. यावर्षी झालेल्या पावसात अनेक रस्ते खचून गेले आहेत. मात्र, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे या रस्त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातून संताप व्यक्त होत आहे.
केबल चोरी वाढली
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युतपंप चालवण्यासाठी ठिकठिकाणी केबल टाकली होती. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.
व्यायामशाळा उभारण्याची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अजूनही काही गावांत व्यायामशाळा नसल्याने युवकांना मोठी अडचण होत आहे. त्यामुळे व्यायामशाळा मंजूर करण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. युवकांना शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायामशाळा गरजेच्या आहेत. त्यामुळे ज्या गावात व्यायामशाळा नाहीत त्या गावात उभारणी व्हावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पांडव यांनी केली आहे.
जडवाहतुकीने रस्त्यांची दुरवस्था
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात नवीन रस्ते मोठ्या प्रमाणात झाले आहेत. तसेच कॉलनीमध्येही रस्ते झालेले आहेत. शहरात सध्या बांधकामे जोरदार सुरू आहेत. यात अवजड वाहने रेती, विटा वाहतूक मोठ्या प्रमाणावर करीत असल्याने रस्ते खचत आहेत.
उसाला पाणी देण्याचा प्रश्न
माजलगाव : तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कडक उन्हाळ्यामुळे विहिरी व इंधन विहिरीच्या पाणीपातळीवर परिणाम होऊ लागला आहे. तालुक्यातील काही भागांत विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यात यावर्षी उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. पाणीपातळी घटत चालल्याने उसाला पाणी द्यायचे कसे? असा प्रश्न ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे.
गादी व्यावसायिकांना मदत द्यावी
बीड : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून लग्नसराई कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद आहे. याशिवाय लॉजिंगही बंद आहे. शाळा, महाविद्यालयेदेखील बंद असल्याने वसतिगृहे ओस पडली आहेत. परिणामी गाद्यांची मागणी कमालीची घटली असून गादी व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गादी व्यावसायिकांना कुटुंब चालवणे अवघड झाल्याने त्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महबूब खान यांनी केली आहे.