अंबाजोगाई: केंद्र व राज्य शासनाच्या दिव्यांगांसाठी असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने अनेक दिव्यांग व्यक्ती योजनांपासून वंचित आहेत. प्रशासनाने दिव्यांगांचे सर्वेक्षण करून योजनांचा लाभ मिळवून द्यावा, अशी मागणी होत आहे.
----------------------------------
नादुरूस्त पथदिवे दुरुस्त करावेत
अंबाजोगाई : शहरांतर्गत विविध भागातील पथदिवे बंद पडले आहेत. पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी नागरिकांची मोठी गैरसोय होते. शिवाय भुरट्या चोऱ्याही वाढल्या आहेत. ही बाब पाहता संबंधितांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विलास कानसुरकर यांनी केली आहे.
------------------------------------
मास्कच्या वापराकडे नागरिकांचे दुर्लक्ष
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाचा संसर्ग सध्या कमी झाला असला तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्याचबरोबर फिजिकल डिस्टन्सचे उल्लंघन होत आहे. प्रशासनाने या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली तरच कोरोना सारख्या महामारीला अटकाव घालता येणार आहे. त्यामुळे विनामास्क वावर करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
----------------------------------
अनावश्यक सेवांनी मोबाईधारक त्रस्त
अंबाजोगाई : मोबाईलचा वापर सर्वत्र वाढला आहे. पण कंपन्यांकडून अनावश्यक सेवांचा भडीमार ग्राहकांवर केला जात आहे. यामुळे मोबाईलधारक त्रस्त झाले आहेत. याची तक्रार संबंधित ग्राहक तक्रार केंद्राकडे करतात. मात्र, समस्यांचा निपटारा होत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. त्यातच अनेक कंपनीचे नेटवर्क राहत नसल्याची ओरड होत आहे.
------------------------------------
कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या
अंबाजोगाई : ऑनलाइन वेतन देयक तयार करण्यासाठी इंटरनेटसह संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक शाळांमधील शिक्षक, तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी ॲड. कल्याण नेहरकर यांनी केली आहे.