तेलगाव नाका - नाळवंडी रस्त्याची तक्रार
बीड : शहरातील तेलगाव नाका ते नाळवंडी नाका रस्त्याची दुरवस्था झाली असून, दुरुस्तीची मागणी होत आहे. खड्डे, धुळीमुळे पादचाऱ्यांसह वाहनधारकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या मार्गावर अवजड वाहनांची होणारी रहदारी लक्षात घेऊन थातूर मातूर काम करण्याऐवजी मजबूत काम करण्याची मागणी प्रदीप सुरवसे, फय्याज शेख, अब्बास शेख, मंगेश घोडके, अनवर बागवान, दिलीप वैद्य, शेख सलीम, मोईन शेख, हिरभाऊ खांडे आदींनी निवेदनाद्वारे केली आहे.
शुद्ध पाणी पुरवठ्याची मागणी
बीड : शहरातील काही भागात मागील अनेक दिवसांपासून अशुद्ध पाणी पुरवठा होत असून, शुद्ध पाणी पुरवठ्याची मागणी नागरिकांतून होत आहे. वेळापत्रकानुसार पाणी पुरवठा होत असला तरी आधी केलेल्या पुरवठ्यातील पाणी पाईपमध्ये राहाते. पुढील पुरवठ्यात हे पाणी अशुद्ध स्वरूपात मिळते. स्वच्छ पाणी पुरवठ्याकडे यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
बांधकाम साहित्य रस्त्यावर
बीड : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. बांधकामसाठी लागणारी वाळू, खडी, विटा हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यावरच टाकण्यात येते. परिणामी शहरवासियांना रस्त्यावरून ये-जा करताना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. ढिगाऱ्यातील वाळू रस्त्यावर पसरत असल्याने दुचाकी व अन्य वाहने घसरत आहेत.