केज (जि. बीड) : गावासाठी टँकरचा प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करूनही मंजूर न झाल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी सरपंचासह ग्रामसेवक व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कार्यालयातच डांबले. ही घटना केज तालुक्यातील पैठण (सा.) येथे गुरुवारी सकाळी वाजेदरम्यान घडली.
पैठण (सा.) हे सुमारे तीन हजार लोकसंख्येचे गाव आहे. गावात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांसह पशुधनाचे पाण्यावाचून प्रचंड हाल होत आहेत. गावाला टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतीने एक ठराव घेऊन पंचायत समितीकडे एक महिना अगोदर पाठविल्याने या प्रस्तावाची गटविकास अधिकारी व तहसीलदार यांनी दि. १ मे रोजी संयुक्तिक पाहणी केली; मात्र टँकर मंजुरीसाठीचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवलाच नाही. टँकर चालू झाले नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी गुरुवार, ९ मे रोजी सकाळी आठ वाजता सरपंच वैजयंता सरवदे, ग्रामसेवक आर. एच. लखने आणि ग्रामरोजगार सेवक मधुकर कदम, संगणक परिचालक प्रियंका भोसले, सुनील चौधरी व राजाभाऊ सरवदे यांना ग्रामपंचातयतीच्या कार्यालयात कोंडून ठेवत कुलूप लावले.
घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य शिवाजी चौधरी, विभागाचे विस्तार अधिकारी गायकवाड, ग्रामसेवक संघटनेचे तालुका सचिव धनराज सोनवणे आणि अॅड. सुधीर चौधरी यांच्यासह ग्रामस्थांशी चर्चा करून उपजिल्हाधिकारी यांच्याकडे तात्काळ प्रस्ताव दाखल करुन टँकर मंजूर करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर ग्रामस्थांनी कुलूप उघडून सरपंचासह ग्रामसेवकांसह कर्मचाऱ्याची दुपारी दोन वाजता सुटका केली.