अवैध धंदे जोमात
पाटोदा : परिसरात बंद झालेले अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे असलेल्या शुकशुकाटाचा फायदा घेत हॉटेल, पानटपरी लगत तसेच लगतच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो. तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.
मोंढा रस्ता खड्ड्यांचा
बीड : शहरातील जालना रोडवरून मसरतनगर मार्गे जाणाऱ्या मोंढा रस्त्यावर खड्डे पडले आहेत. अनेक दिवसांपासून खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे, परंतु अद्यापही हे खड्डे ‘जैसे थे’ आहेत. येथून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने खड्डे पडले असून ते बुजविण्याची मागणी आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष झाले आहे.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांचे संसारात कलह वाढत चालले आहेत.
कचऱ्याचे ढिगारे पडून
माजलगाव : शहरातील नवीन बसस्थानक सभोवती मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढिगारे पडून आहेत. याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. दुर्गंधीचा त्रास येथील नागरिकांना करावा लागतो.