बँड चालक अडचणीत
अंबाजोगाई : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालय बंद ठेवण्यात आल्यामुळे अनेकांनी बुकिंग केलेले बँड पथकही रद्द केले आहे. तर होणारी लग्नही पन्नास व्यक्तिंच्या उपस्थितीत होत असल्याने गाजावाजा न करता, लग्न होऊ लागल्याने बँडवाल्यांना बोलावले जात नाही. त्यामुळे बँड पथकातील कामगार संकटात सापडले आहेत.
लॉकडाऊन न करता पर्यायी मार्ग काढा
अंबाजोगाई : लॉकडाऊनमुळे सामान्य माणसांचे जनजीवन विस्कळीत होते. अनेक उद्योगधंदे ठप्प पडतात. व्यापाऱ्यांना दुकानभाडे, वीजबिल, कामगारांचा पगार दुकान बंद असले तरीही द्यावा लागतो. त्यामुळे लॉकडाऊन झाले तर अनेक कुटुंब रोजगारापासून वंचित होतील. त्यामुळे लॉकडाऊन न करता, यातून पर्यायी मार्ग काढावा. सध्या हॉटेल बंद केल्यामुळे आधीच मंदीत असलेला हा व्यवसाय पुन्हा अडचणीत सापडला आहे. त्यामुळे लॉकडाऊनवर पर्यायी मार्ग काढावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विनोद पोखरकर यांनी केली आहे.
शौचालय वापराकडे ग्रामस्थांचे दुर्लक्ष
अंबाजोगाई : गाव व परिसर सतत स्वच्छ राहावा, यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत गावोगावी अनेक कुटुंबांना शौचालये बांधून देण्यात आली आहेत. मात्र, ग्रामस्थांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. गावोगावी अजूनही उघडयावर घाण करण्याचे प्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाची भीती
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. ग्रामीण भागातही रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या आठवडाभरात अचानक रुग्णांची वाढलेली संख्या पाहता, अंबाजोगाई तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून, ग्रामीण भागातून शहरात कामानिमित्त येणाऱ्या ग्रामस्थांच्या संख्येत घट झाली आहे. पोलिसांकडूनही मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जात आहे.