लोकमत न्यूज नेटवर्कआद्यकवी मुकुंदराज साहित्य नगरी (अंबाजोगाई) :‘द्याल का हो शासन दरबारी प्रतिनिधित्व दिव्यांगालाप्रश्न अद्यापी नाही सुटला ७० वर्षे झाली स्वातंत्र्याला’अशा शब्दांतून भरत शिंदे या अंध असलेल्या कवीने दिव्यांग अंधांची समस्या सर्वांसमोर मांडली. नांदेडहून खास कविसंमेलनामध्ये सहभागी होण्यासाठी ते आले. मराठवाडा असोसिएशन आॅफ दि ब्लार्इंड या संस्थेच्या माध्यमातून ते गेले तीस वर्षे समाजात अंधांच्या समस्येविषयी संपूर्ण राज्यात प्रबोधन करत आहेत.
वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली आणि आयुष्यात कायमचा अंधार आला. परंतु, हिंमत न हारता त्यांनी ज्ञानरुपी प्रकाशाची कास धरत पदवी शिक्षण पूर्ण केले. बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी मुंबईमध्ये घेतले. तेथे टेलिफोन आॅपरेटरचा डिप्लोमा घेतला. नांदेडला पदवी शिक्षण घेतल्यानंतर १९८७ साली मराठवाडा असोसिएशन आॅफ दि ब्लार्इंड ही संस्था स्थापन केली.
ते म्हणतात, ‘शिक्षणामुळे मला दृष्टी मिळाली. समाज आज एवढा प्रगत झाला तरी अंध आणि इतर दिव्यांगांना समाजाच्या मुख्य प्रवाहात समावून घेतले जात नाही. त्यांच्याविषयी असणारी उदासिनता नष्ट करण्याचे काम आम्ही करतो. त्यासाठी संपूर्ण राज्यात लोकांना जागृत करून अंधांच्या समस्या सांगतो, त्यांना वेगळेपणाची वागणूक न देण्याचा संदेश देतो. तसेच शासनाच्या विविध योजनांची माहिती व लाभ अंधापर्यंत पोहोचविणे आणि शासनापर्यंत त्यांच्या समस्या नेणे असे दुवा म्हणूनही काम करतो.
दिव्यांगाच्या समस्या मांडण्यासाठी व सोडविण्यासाठी शासन दरबारी दिव्यांगांचा एक प्रतिनिधी असावा अशी त्यांची मागणी आहे. तीच त्यांनी बे्रल लिपित लिहिलेली कविता वाचून केली. संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी यांची भेट घेऊन त्यांनी म्हणणे मांडले.