बीड : जिल्ह्यातील सोयाबीन क्षेत्रात मागील काही वर्षांत वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे बियाणांचीदेखील कमतरता भासत होती. दरम्यान, बोगस बियाणांमुळे दुबार पेरणीचे संकटदेखील शेतकऱ्यांवर आले होेते. त्यामुळे घरच्या सोयाबीनचे बियाणे स्वच्छ करून वापरण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
गावोगावी कृषी विभागाकडून सोयाबीन उगवण क्षमतेची प्रात्यक्षिके दाखवली जात असून, यामध्ये ७० टक्क्यांपेक्षा जास्त उगवण क्षमता असेल तरच, त्या बियाणांचा वापर पेरणीसाठी करावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मागील कृषी विभागाने अंदाजे १ लाख ९० हजार हेक्टर सोयाबीनचे सर्वसाधारण क्षेत्र ग्राह्य धरले होते. मात्र, जवळपास २ लाख ४१ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. यावर्षीदेखील हे क्षेत्र वाढण्याची शक्यता कृषी विभागाकडून वर्तवली जात आहे. मागील वर्षी विविध कंपनीकडून बोगस सोयाबीन बियाणे पुरवठा करण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली होती. यामुळे आर्थिक नुकसान झाले होते. याची भरपाईदेखील अद्याप अनेकांना मिळालेली नाही. दरम्यान, यावर्षी सोयाबीन पिकाचे वाढणारे क्षेत्र लक्षात घेता, शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांचा वापर जास्तीत करावा यासाठी जिल्हा कृषी विभागाकडून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे.
जिल्ह्यातील सर्वच तालुका कृषी अधिकारी व कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सोयाबीन उगवण क्षमता कशी तपासावी याची प्रात्यक्षिके दाखवत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमधून या मोहिमेचे स्वागत केले जात आहे.
...अशी तपासा उगवण क्षमता
सुती पोते किंवा चौकोनी कपडा पूर्णपणे भिजवून घ्यावी. त्यानंतर ती व्यवस्थितपणे जमिनीवर अंथरून ठेवावी. प्रत्येक ओळीमध्ये १०-१० बियांचा वापर करून दहा रांगा करून व्यवस्थितपणे बियाणे ठेवून घ्यावे. यानंतर पोते गोलाकार गुंडाळून घ्यावे. गुंडाळताना ओल्या पोत्यातील बिया हलणार नाहीत याची दक्षता घ्यावी. यानंतर गुंडाळलेल्या पोत्यास कडेला सुतळीने बांधून घ्यावे आणि तीन ते चार दिवस सावलीला ठेवून त्यावर दिवसातून चार वेळा हलकेसे पाणी शिंपडावे. तीन ते चार दिवस झाल्यानंतर उगवण झालेली एक एक रांग मोजून घ्यावी. १०० पैकी किती बियाणांना मोड आलेले आहेत असे सुदृढ व निरोगी बियाणे मोजून घ्यावे. ६१ ते ७० टक्के उगवण क्षमता असेल तरच बियाणे पेरण्यासाठी वापरावे.
....
गावीगावी राबवलेल्या प्रात्यक्षिक मोहिमेमुळे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ६१ ते ७० टक्के बियाणांची उगवण क्षमता असेल तर, सरासरी एकरी ३२ ते ३५ किलो सोयाबीन बियाणे वापरावे. ६० टक्क्यांपेक्षा कमी उगवण क्षमता असे तर, त्या बियाणांचा वापर शेतकऱ्यांनी करू नये.
-डी. जी. मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बीड
===Photopath===
040521\04_2_bed_15_04052021_14.jpeg
===Caption===
कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे उगवण क्षमतेचे प्रात्यक्षिक दाखवताना