बीड : एकीकडे श्रावण महिना असल्याने फळांची मागणी वाढली असतानाच, डेंग्यूच्या संकटाने मल्टी व्हिटॅमिन असलेले आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे ड्रॅगन फ्रुट आणखी महाग झाले आहे. सुरुवातीला चीनमधून येणाऱ्या या फळाचे मागील काही वर्षांत भारतीय शेतकरी मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत. मुंबई, पुण्याच्या ठोक बाजारातून, तसेच बीडसह सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यातून ड्रॅगन फ्रुटची आवक वाढली आहे. येथील फळांच्या ठोक बाजारात रोज अडीच ते तीन क्विंटल ड्रॅगन फ्रुटची आवक होत आहे. कोरोनाच्या लाटेपासून या फळाचे महत्त्व अनेकांना कळले आहे. डेंग्यू आणि साथरोगांच्या काळात अशक्तपणा घालविण्यासाठी ड्रॅगन फ्रुटची मागणी वाढल्याने बाजारात भावही किलोमागे २० ते ३० रुपयांनी वधारला आहे. १) फळांचे दर (प्रतिकिलो)
ड्रॅगन फ्रुट ---- १४० ते १६०
डाळिंब - --- ७० ते ८०
सफरचंद -- ८० ते १५०
संत्री (साउथ आफ्रिका) -- १६०
मोसंबी -- ५० ते ६०
चिकू -- ५० ते ६०
पपई -- २५ ते ३०
पेरू -- १०० ते ११०
किवी ( बॉक्स) -- ८० ते १००
२) डेंग्यूवर ड्रॅगनचा उतारा (बॉक्स)
यात प्रोटीन जास्त असल्याने अनेक आजारांवर गुणकारी मानले जाते. डेंग्यू झाल्यावर हाडे कमजोर पडतात. मात्र, ड्रॅगन फ्रुट सेवन केल्याने आधार मिळून हाडे व दात मजबूत होतात. कोलेस्ट्रॉल व साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्याबराेबरच व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन बी आणि हिमोग्लोबिन वाढण्याबरोबरच रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याने व कॅन्सर प्रतिबंधक असल्याने या फळाला चांगली मागणी आहे.
३) आवक वाढल्याने सफरचंद स्वस्त
मागील महिन्यापासून शिमला सफरचंदाची आवक वाढली आहे. २,५०० ते ३,५०० रुपयांना मिळणारी २५ किलोची पेटी सध्या १,५०० ते २,३०० रुपयांना मिळत आहे. किरकोळ बाजारात दर्जा व आकारानुसार ७० रुपयांपासून १४० रुपये किलोपर्यंत भाव आहेत.
४) एका व्यापाऱ्याची प्रतिक्रिया
श्रावणात उपवासामुळे फळांना चांगली मागणी आहे. येथील फळ बाजारात सर्वच फळांची आवक होत आहे. कोरोना, डेंग्यू व इतर आजारात रोगप्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या ड्रॅगन फळाला मागणी असून, स्थानिक ड्रॅगन फ्रूट चवदार व पौष्टिक आहे. शिमला सफरचंदाची आवक वाढल्याने भाव काही प्रमाणात कमी झाले आहे. दोन-तीन दिवसांत पावसामुळे ग्राहकी मंदावलेली आहे.
-- हरुण अब्बास बागवान, फळांचे व्यापारी, बीड.