अंबाजोगाई : परवानगी नसतानाही कृषी बाजारपेठेत अनेक बनावट कीटकनाशके विक्री केली जात असून, शेतकऱ्यांची आर्थिक लूट होत असताना कृषी विभाग मात्र कारवाईकडे कानाडोळा करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांतून संताप व्यक्त केला जात आहे.
सध्या मुबलक प्रमाणात पाऊस झाल्याने कापूस, सोयाबीन ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. मात्र, काही भागांत सोयाबीन व कापसावर थ्रीप्स, मावा, बुरशी, अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. कीडींपासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी आता फवारणीमध्ये गुंतले आहेत. या फवारणीसाठी बाजारपेठेत विविध कंपन्यांची कीटकनाशके उपलब्ध आहेत. मात्र, यापैकी अनेक कंपन्यांच्या कीटकनाशकांना ॲक्टनुसार विक्रीची परवानगी नाही. असे असताना केवळ पीजीआरचा सहारा घेऊन आणि नावे बदलून कीटकनाशकांची विक्री चालवली आहे. गेल्यावर्षी अंबाजोगाईच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर सोयाबीनच्या बोगस बियाणांची विक्री झाली होती. याचा फटका तालुक्यातील एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना बसला होता. बोगस कंपन्यांचे बियाणे न उगवल्याने अनेक कंपन्यांवर गुन्हा नोंद झाला. बियाण्यापाठोपाठ आता बनावट कीटकनाशकेही बाजारात विक्रीसाठी आल्याने शेतकरीही धास्तावले आहेत.
उत्पन्न घटण्याची भीती
विशेष म्हणजे, अनधिकृतरित्या विक्री केल्या जाणाच्या अनेक कीटकनाशकांमध्ये निंबोळी अर्काशिवाय इतर कोणत्याही रासायनिक घटकांचा समावेश केलेला नाही. ही कीटकनाशके शेतकऱ्यांच्या डोळ्यांत धूळफेक करणारी असून बाजारपेठेत अशा कीटकनाशकांची सर्रास विक्री केली जात आहे. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे.
---------
गुणनियंत्रकामार्फत तपासणी करावी
कीटकनाशकांची प्रयोगशाळेत तपासणी करूनच ती बाजारपेठेत विक्री करावीत, असा निर्णय न्यायालयाने दिलेला आहे. मात्र, कोणतीही तपासणी न करता विविध कंपन्यांची कीटकनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारली जात आहेत.
त्यामुळे या कीटकनाशकांची गुणनियंत्रकामार्फत तपासणी झाली पाहिजे. -प्रभाकर कुलकर्णी, शेतकरी
---------
कृषी विभागाचे कानावर हात
बाजारात येणारी बियाणी, कीटकनाशके यांची प्रतवारी व गुणवत्ता तपासणीसाठी तालुका कृषी विभागाचे पथक कार्यरत असते. मात्र, व्यापारी व कृषी अधिकाऱ्यांतील प्रेमळ संबंधामुळे कारवाई होत नाही. शेकऱ्यांच्या तक्रारीच कृषी कार्यालयात येत नाहीत. असे समर्पक उत्तर कृषी विभागाकडून दिले जाते.
--------
पावतीही मिळत नाही
विविध कंपन्यांची बनावट कीटकनाशके २२०० ते २६०० रुपये लीटर या दराने विक्री केली जातात. विशेष म्हणजे काही कीटकनाशकांच्या खरेदीनंतर शेतकऱ्यांना रितसर पावतीही दिली जात नाही, तर मागणी असलेली कीटकनाशके आड मार्गाने दामदुप्पट दरानेही व भेसळ करून विक्री केली जात आहेत. परवानगी नसतानाही ही कीटकनाशके बाजारपेठेत विक्री होताना कृषी विभागाकडून मात्र कारवाई होत नाही.