शिरूर कासार : तालुक्यात यंदा पाण्याची उपलब्धी चांगली असल्याने रबी हंगामात गव्हाबरोबर हरभरा क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र, पिकांसाठी हवी असणारी थंडी पाहिजे तेवढी नसल्याने व ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर शेंडे कुरतडणारी अळी तसेच घाटेअळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी तालुका कृषी कार्यालयाचे अधिकारी, कर्मचारी हे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन किटकांच्या नाशासाठी पिकात ट्रॅप लावत आहेत. ट्रॅप कसा लावायचा व तो लावल्यानंतर होणारा फायदा याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.
हरभरा पिकासोबत गव्हाचा पेरा केला जातो. जसजसे शेत रिकामे होईल तसतसे टप्पे करून पेरा केला आहे. त्यामुळे काही क्षेत्रांत हरभरा फुलात आला तर काही क्षेत्रांवर घाटे दिसून येतात. नेमके याचवेळी शेंडे कुरतडणारी अळी व घाटेअळीचा मोठा प्रादुर्भाव होऊन पिकाचे नुकसान होत असते. ते टाळण्यासाठी हे ट्रॅप लावल्यास यात अळ्या अडकतात. त्यामुळे त्यांचा फैलाव होण्यास चांगलाच प्रतिबंध होतो. तसेच औषध फवारणी कमी होण्यास मदत होते, असे कृषी समन्वयक कविता ढाकणे यांनी सांगितले.
तालुक्यात सध्या गहू, हरभरा पिकांची स्थिती समाधानकारक असली तरी रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कृषी कार्यालयाच्या या मोहिमेला शेतकरी चांगला प्रतिसाद देत असल्याचे तालुका कृषी अधिकारी गांगर्डे व कृषी पर्यवेक्षक दिलीप तिडके यांनी सांगितले. या मोहिमेत मंडळ कृषी अधिकारी राजबिंडे ,सुभाष शेंडगे आदींचा सहभाग आहे.
शिरूर तालुक्यात पेरा क्षेत्र
गहू ४,२५४ हेक्टर
हरभरा ७,४६४ हेक्टर
----------