- सोमनाथ खताळ
बीड : सांभाळ होत नसल्याने तीन मुलांनी ८० वर्षीय आईला निराधार बनविले होते. यावर ‘लोकमत’ने प्रकाश टाकला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्त्यांनी या मुलांचा शोध घेतला. त्यांचे समुपदेशन करून कायद्याची भिती दाखविली. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा दोन मुलांनी जिल्हा रूग्णालयात धाव घेत माफी मागत आईला स्वत:च्या घरी घेऊन गेले. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्यामुळे जीवंतपणी मरणयातना भोगणाऱ्या निराधार आईला दुर केलेल्या मुलांनीच आधार दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील एका गावातील सोनाबाई (नाव बदलले) यांना शिक्षक, सुरक्षा रक्षक व टेलरिंंगचे काम करणारी तीन मुले आहेत. मात्र, तिघांच्या वादात त्यांना कोणीच सांभाळत नव्हते. तिघांनीही आईला सांभाळण्यास असमर्थता दर्शवित आजारी असल्याचे सांगत जिल्हा रूग्णालयात दाखल केले. हाच प्रकार ‘लोकमत’ने २८ व २९ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून निदर्शनास आणला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे, अशोक तांगडे यांनी सोनाबाईची भेट घेतली. त्यांच्या मुलांशी संपर्क केला. त्यांना बोलावून घेत समुपदेशन केले. दोन मुलांनी आईची माफी मागितली. तसेच आपण घरी घेऊन जात असल्याचे लेखी लिहून देत सोनाबाईला घरी घेऊन गेले. जिल्हा रूग्णालयात खाटावर असलेल्या सोनाबाईला नंतर गादी घेतली. स्वतंत्र रूममध्ये ठेवून पंखा व इतर सुविधांची सोय केली. हे सर्व झाल्यानंतर आणि मुलांना चुक समजल्यावरच सामाजिक कार्यकर्त्यांनी घरातून काढता पाय घेतला. या सर्व प्रकारामुळे समाधान व्यक्त होत आहे.
( मुलांनी टाकून दिलेल्या वृद्ध आईला हवाय आधार! )
‘लोकमत’च्या वृत्तानंतर मदतीसाठी सरसावले हात‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, संघटनांनी मदतीची तयारी दर्शविली. औरंगाबादचे अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे यांनीही संपर्क करून सांभाळण्याची इच्छा दर्शविली. तसेच बीडमधील जिव्हाळा सामाजिक संस्था, मुंबई, पुणे, अहदनगर आदी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी संपर्क करून मदतीची इच्छा व्यक्त केली होती.
डॉक्टर, परिचारीकांच्या चेहऱ्यावरही हास्यवारंवार रूग्णालयात अॅडमिट होत असलेल्या सोनाबाईची परिस्थिती आणि हाल पाहून डॉक्टर, परिचारीकाही भाविक झाल्या होत्या. मागील काही दिवसांपासून तेच सोनाबाईचे नातेवाईक झाले होते. आता त्यांच्या दोन्ही पोटच्या मुलांनीच रूग्णालयात येऊन लेखी देत घरी घेऊन गेल्याने डॉक्टर, परिचारीकांच्या चेहऱ्यावर हास्य दिसले. होणाऱ्या हालातून मुक्त झाल्याने सर्वांनीच समाधान व्यक्त केले.