- संजय खाकरेपरळी (बीड) : जादा व्याजाचे आमिष दाखवून परळी शहरातील 142 ठेवीदारांना सात कोटी 53 लाख 29 हजार 968 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी येथील राजस्थानी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी परळी चेअरमन चंदूलाल बियाणी यांच्यासह १७ संचालक व अधिकाराविरुद्ध परळी शहर पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वीज कंपनीचे सेवानिवृत्त कर्मचारी बिभीषण मानाजी तिडके राहणार नेहरू चौक परळी यांनी परळी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली त्यावरून कारवाई करण्यात आली आहे.
यांच्यावर दाखल झाले गुन्हे : चेअरमन चंदुलाल बियाणी, संचालक बालचंद्र लोढा, अभिषेक चंदुलाल बियाणी,बद्रीनारायण बाहेती, प्रल्हाद अग्रवाल ,विजय लड्डा,अशोक जाजू ,सतीश सारडा ,प्रेमलता बाहेती, कल्पना बियाणी, नामदेव रोडे,जगदीश बियाणी, अधिकारी व्ही बी कुलकर्णी, तुषार गायकवाड, प्रदीप मुरकुटे, राजेश मोदानी व सोसायटीचे इतर कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहा महिन्यापासून पाच शाखा बंदगेल्या ६ महिन्यापासून राजस्थानी मल्टीस्टेटच्या परळी येथील मुख्य कार्यालयअरुणोदय मार्केट, पंचशील नगर, नेहरू चौक, गणेशपार रोड, थर्मल रोड ही पाच शाखा कार्यालय बंद आहेत. चेअरमन व संचालकांनी सोडले शहर. चेअरमन व संचालक मंडळ गेल्या काही महिन्यापासून परळीतून निघून गेले आहेत. त्यामुळे ठेवीदारांना आपल्या ठेवीची रक्कम मिळत नसल्याने अनेकांची आर्थिक अडचण झाली आहे. याप्रकरणी ठेवीदारांनी परळीच्या तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा मार्गही अवलंबिला होता तसेच 25 एप्रिल रोजी दिला होता तक्रार अर्ज. परळी शहर पोलीस ठाण्यात 25 एप्रिल रोजी चेअरमन व संचालक मंडळविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी ही एका तक्रार अर्जाद्वारे द्वारे 142 ठेवीदारांनी केली होती.
ठेवीदारांच्या एकजुटीचा विजयठेवीदारांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार ससाने यांची तीन दिवसांपूर्वी भेट घेतली. त्यानंतर गुरुवारी रात्री ठेवीदार पुन्हा एकत्र आले. सर्वांनी परळी शहर पोलीस निरीक्षक संजय लोहकरे व राजकुमार ससाने यांची भेट घेऊन संचालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी लावून धरली. ठेवीदारांनी ठाण्यात ठिय्या दिल्याने अखेर पहाटेतीन वाजता चेअरमनसह १७ संचालक व अधिकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ठेवीदार एकजुटीचा मोठा विजय यातून दिसून आला. सेवानिवृत्त कर्मचारी बिभीषण तिडके यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपल्या व आपल्या पत्नीच्या नावाने राजस्थानी मराठी स्टेटच्या नेहरू चौक शाखेत 13 लाख 33 हजार 251 रूपयांची एफडी केली होती. परंतु याचे पैसे मागण्यास गेले असता राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन व अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केली. डिसेंबरपासून मल्टीस्टेटची शाखा व मुख्य कार्यालय बंद आहे.
आईवर उपचार करण्यात पैसे नव्हते आई भाऊ व माझ्या नावाने एकूण 53 लाख रुपयाची एफडी राजस्थानी मल्टीस्टेट पंचशील नगर शाखेत केलेली आहे. आईच्या इलाजासाठी सुद्धा आमच्या हक्काचे पैसे राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन व व्यवस्थापकाने दिले नाहीत. त्यामुळे उपचार करता आले नाहीत त्यातच आईचे निधन झाले तसेच भावाची तब्येत खराब झाली आहे. तरीसुद्धा उपचारासाठी पैसे दिले जात नाहीत. संचालक मंडळाच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी आपण पोलिसाकडे केली आहे.- सुलताना शेख, परळी
ठिय्या दिल्याने गुन्हा दाखल गुरुवारी 142 ठेवीदार एकत्र आले आणि पोलीस निरीक्षकांची भेट घेतली. गुन्हे दाखल करण्याची मागणी लावून धरत पहाटेपर्यंत ठाण्यात ठिय्या दिला. तेव्हा कुठे सर्वांवर गुन्हे दाखल करण्यात आले.-सेवकराम जाधव, ठेवीदार , सामाजिक कार्यकर्ते परळी
पुढील कारवाई करण्यात येईल ठेवीदारांच्या फसवणूक प्रकरणी राजस्थानी मल्टीस्टेटच्या चेअरमन व संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल. - संजय लोहकरे, शहर पोलीस निरीक्षक परळी