लोकमत न्यूज नेटवर्कबीड : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक शिक्षणाधिका-याचा अतिरिक्त पदभार आता सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर समग्र शिक्षा विभागाच्या उपशिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक अजय बहीर यांच्याकडे देण्यात आला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी याबाबत शनिवारी आदेश दिल्याचे समजते. प्रशासकीय कामकाजात असा प्रयोग प्रथमच होत आहे.सप्टेंबरमध्ये उपशिक्षणाधिकारी (प्रा.) पदी सुदाम राठोड यांची नियुक्ती झाली होती. महिनाभरातच शिक्षणाधिकारी (प्रा.) राजेश गायकवाड यांना शासन सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. त्यामुळे उपशिक्षणाधिकारी राठोड यांच्याकडे शिक्षणाधिका-याचा अतिरिक्त पदभार देण्यात आला होता. राठोड यांनी जवळपास शंभर दिवस कामकाज पाहिले. ३१ डिसेंबर रोजी नियत वयोमानानुसार राठोड सेवानिवृत्त झाल्याने प्रभारी शिक्षणाधिकाऱ्यांसह उपशिक्षणाधिका-यांचे पद पुन्हा रिक्त झाले. या पदावर कोणाची नियुक्ती होते, याकडे लक्ष लागले होते. मात्र शिक्षणाधिकारी पदासाठी सर्वच बाबतीत सक्षम, पात्र व्यक्तीची नियुक्ती गरजेची होती. त्यादृष्टीने मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी अखेर सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार सोपविला.राठोड यांच्याकडे समग्र शिक्षा विभागाचा पदभार होता. या विभागाच्या उपशिक्षणाधिकारीपदाचा अतिरिक्त पदभार अजय बहीर यांच्याकडे सोपविला. बहीर हे शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक आहेत. दोन पदे सांभाळताना त्यांनाही कसरत करावी लागणार आहे.राठोड यांच्या निवृत्तीनंतरी शिक्षणाधिकारी पदासाठी उपशिक्षणाधिकारी नजमा सुलताना, वडवणीच्या गटशिक्षणाधिकारी मिनहाज पटेल, पोषण आहार अधीक्षक अजय बहीर तसेच विस्तार अधिका-यांपैकी देखील काही नावेचर्चेत होती. मात्र शासनाचे निर्देश, प्रशासकीय व्यवस्था आणि पात्र व्यक्तीची नियुक्ती महत्वाची होती. अखेर मुख्य कार्यकारी अधिका-यांनी हा पेच सोडविला आहे.शिक्षक ते उप मुख्य कार्यकारी अधिकारीशेतकरी कुटुंबातील प्रमोद हनुमंत काळे मुळचे बार्शीचे. एम. ए. राज्यशास्त्र व नेट सेट उत्तीर्ण आहेत.२००६ ते २००९ या कालावधीत बार्शी तालुक्यातील पानगाव येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. राज्य लोकसेवा आयोगाच्या दोन पदांच्या परीक्षा ते उत्तीर्ण आहेत.२००९ ते २०१० कालावधीत ते सोलापूर येथे नायब तहसीलदार होते. २०११ ते २०१३ दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब, २०१३ ते २०१७ मध्ये करमाळा आणि २०१७ ते २०१९ पर्यंत बार्शी येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले.त्यानंतर बीड जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.शिक्षक, ना. तहसीलदार, बीडीओ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आहे. अवघ्या पाच महिन्यातच शिक्षणाधिका-याचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
डेप्युटी सीईओंकडे शिक्षणाधिकाऱ्यांचा अतिरिक्त पदभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 1:17 AM