उपमुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला; आरोग्य कर्मचाऱ्यांवर लाठीमार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2021 08:48 AM2021-06-19T08:48:18+5:302021-06-19T08:49:14+5:30
बीडमधील प्रकार, सेवेत कायम करून घेण्यासाठी करीत होते घोषणाबाजी. आरोग्य यंत्रणेचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने तीन महिन्यांच्या कंत्राटावर वॉर्डबॉय, परिचारिका, डाटा एंट्री ऑपरेटर, हॉस्पिटल मॅनेजर, डॉक्टर, औषधनिर्माण अधिकारी, आदी पदे भरण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले; परंतु आता रुग्णसंख्या कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : आरोग्यसेवेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करून घ्यावे, या मागणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अडविला. पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करीत जमाव पांगविला. यामुळे काही वेळ गोंधळ उडाला.
आरोग्य यंत्रणेचे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने तीन महिन्यांच्या कंत्राटावर वॉर्डबॉय, परिचारिका, डाटा एंट्री ऑपरेटर, हॉस्पिटल मॅनेजर, डॉक्टर, औषधनिर्माण अधिकारी, आदी पदे भरण्यात आली. या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले; परंतु आता रुग्णसंख्या कमी झाल्याने या कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात येत आहे. कामावरून काढू नये, आरोग्यसेवेत कायम करून घ्यावे, यासाठी आरेाग्य कर्मचारी आक्रमक झाले होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक संपवून उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या गाड्यांचा ताफा उस्मानाबादकडे रवाना झाला. याचदरम्यान शासकीय विश्रामगृहासमोर कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी गाड्यांचा ताफा अडविला. यावेळी तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला. काही कर्मचारी दुभाजकावरून पडल्याने जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत पवार यांची भेट मागणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
लाठीचार्जची चौकशी करा
कोरोना महामारीत या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावले. हे लोक आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यासाठी गेल्यावर त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, ही बाब निषेधार्ह आहे. कोणाच्या सांगण्यावरून हा लाठीचार्ज केला, याला कोण जबाबदार याची चौकशी करावी.
सुरेश धस, आमदार, भाजप
निवेदन न घेताच ताफा सुसाट
n कर्मचारी निवेदन देण्यासाठी गाड्यांकडे धावले; परंतु एकाही मंत्र्याने अथवा अधिकाऱ्यांनी त्यांचे निवेदन घेतले नाही. त्यामुळे कर्मचारी आक्रमक झाले होते.
n ताफा पुढे गेल्यावर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु तरीही कर्मचारी आक्रमक होते. सरकारविरोधात घोषणा देत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
संतापजनक बाब
पोलिसांच्या लाठीचार्जचा आम्ही निषेध करतो. महिलांवर पोलिसांनी हात उगारला. याची चौकशी करावी तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवल्यानंतर पालकमंत्री धनंजय मुंडे खाली उतरले. पालकमंत्री या नात्याने त्यांनी निवेदन स्वीकारणे गरजेचे होते. परंतु ते गाडीत बसून निघून गेले. ही बाब संतापजनक आहे. सर्वांना सेवेत कायम करून घ्यावे, अशी आमची मागणी आहे, असे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी सांगितले.