बीड : शहरात अनधिकृत नळ जोडणी असल्याचे ‘लोकमत’ने निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर याची पाणीपुरवठा विभागाने गंभीर दखल घेत अनधिकृत नळ जोडणींवर कारवाई करण्यासाठी पाच जणांचे पथक नियुक्त केले आहे.
बीड शहरात गल्लीबोळात काही धनदांडग्यांनी लोकप्रतिनिधी व तत्कालीन अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मुख्य जलवाहिनीला नळ जोडणी घेतल्या. अनेकांच्या घरी दोन ते तीन नळ जोडणी आढळून येतात. त्यामुळे काही भागात सर्वसामान्यांना थोडेसे पाणी मिळते.
या अनधिकृत नळ जोडणी असणाºयांना मात्र जास्त पाणी जाते. पाणीसाठा कमी असल्याने त्यांच्याकडून पाण्याचा अपव्यय होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. याच अनधिकृत नळ जोडणीबाबत ‘लोकमत’ने आठ दिवसांपूर्वी वृत्त प्रकाशित केले होते. यामध्ये अनधिकृत नळ जोडणी तोडण्यासाठी गेलेल्या अधिकाºयांवर कशा प्रकारे दबाव आणला जातो ? तसेच पाणीपुरवठा विभागातील काही सुपरवायझर कशा प्रकारे हात झटकतात, हे दाखवून दिले होते. त्यानंतर यावर सविस्तर अभ्यास करुन पाणीपुरवठा विभागाने विशेष पथक नियुक्त केले आहे.
यात पाच कर्मचारी असून, पी. आर. दुधाळ हे पथकप्रमुख राहतील. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल टाळके, निखिल नवले, श्रध्दा गर्जे हे पथकावर नजर ठेवून दररोजच्या कारवायांचा आढावा घेणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले.नवख्या अधिका-यांकडून बीडकरांना अपेक्षापालिकेतील राजकारण अधिकारी व कर्मचा-यांसाठी काम करताना अडथळा ठरत असल्याचे यापूूर्वीच समोर आले आहे. परंतु पाणीपुरवठा विभाग याला अपवाद ठरत आहे. बीड शहराला सुरळीत व वेळेवर पाणीपुरवठा करण्यासाठी योग्य नियोजन केले जात आहे. राहुल टाळके, निखील नवले व श्रध्दा गर्जे हे तिन्ही अधिकारी नवखे असून, त्यांच्याकडून यापुढेही सुरळीत पाणीपुरवठ्याची अपेक्षा बीडकरांना आहे.दरम्यान, या तिन्ही अधिकाºयांच्या बदलीची सध्या चर्चा पालिकेत सुरू आहे. परंतु याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही. हे तीन अधिकारी आल्याने पाणीपुरवठा विभागाचा कारभार काही प्रमाणात सुधारला आहे.
अद्याप एकही कारवाई नाहीचार दिवसांपूर्वी नियुक्त पथकाकडून अद्याप एकही कारवाई झालेली नाही. पूर्णपणे कर्मचारी कारवाईसाठी न उतरल्याचे यावरुन दिसून येते. अभियंता निखील नवले म्हणाले, बीड शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. तसेच अनधिकृत नळ जोडणी तोडण्यासाठीही पथक नियुक्त केले असून, लवकरच त्यांनी कारवाई केलेले दिसेल. कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असे त्यांनी सांगितले.