कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने नोंदणीकृत बांधकाम मजूर, ऑटोचालक तसेच इतर घटकांना मदत करण्याचे जाहीर करण्यात आले होते. यातील अनेक घटकांना अद्यापही मदत मिळालेली नाही. त्यामुळे शासनाने तात्काळ मदत करावी. संचारबंदीमुळे अनेकांचे व्यवसाय बंद आहेत. परिणामी, हातावर पोट असणाऱ्या मजुरांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासनाने मदत केल्यास त्यांना आधार मिळणार आहे. अजूनही अनेक कामगारांच्या नोंदणीचे नूतनीकरण झालेले नाही. त्यामुळे शासनाने सर्वांना सरसगट मदत करावी, अशी मागणी कामगारवर्ग करत आहे.
कामगारांसोबतच समाजात अनेक वंचित घटक आहेत. त्यांनाही मदतीची गरज आहे. ज्यांना मदत जाहीर झाली, त्या घटकात अनेकांची नोंदणी नाही. अनेक नोंदणी कार्यालये जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. सध्या लॉकडाऊनमुळे वाहने बंद आहेत. तर नोंदणीच्या कार्यालयात एकाच वेळी काम होईल अशीही स्थिती नाही. परिणामी अनेकांची नोंदणी रखडली. यासाठी शासनाने सरसगट मदत करावी, याबाबत शासनाने निर्णय घेण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते ॲड. सुभाष शिंदे यांनी केली आहे.