लोकमत न्यूज नेटवर्क
कडा : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती; पण यातील एकाने राजीनामा दिला आहे. एक महिला वैद्यकीय अधिकारी सध्या कार्यरत आहेत. सोमवारी येथे वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथे आलेल्या रुग्णावर चक्क समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडून उपचार केले जात असल्याचे दिसून आले.
कडा हे प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत डोंगरगण, रुईनालकोल, शेरी, चोभानिमगाव, जळगाव, शिराळ, कडा ही सात उपकेंद्रे येत आहेत. ४८ हजार लोकसंख्या आहे. येथे येणाऱ्या रुग्णांवर उपचार व्हावेत, कोरोना चाचण्या यासह अपघातातील रुग्ण अन्य लोकांची नेहमीच वर्दळ असते. गैरसोय होऊ नये म्हणून येथे दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक होती. एकाने राजीनामा दिल्याने एकच महिला वैद्यकीय अधिकारी आहे; पण एकही वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याने समुदाय आरोग्य अधिकारी हेच आलेल्या रुग्णांवर उपचार करीत असल्याचे धक्कादायक चित्र येथे पाहावयास मिळाले. या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. संजय खंडागळे यांनी केली आहे.
...
एका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. दुसऱ्या महिला वैद्यकीय अधिकारी आहेत. गैरहजर असलेल्या ‘त्या’ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवून योग्य कारवाई करण्यात येईल.
--डाॅ. जयश्री शिंदे, आष्टी तालुका आरोग्य अधिकारी