केज : तालुक्यातील पळसखेड येथील शेतकरी प्रशांत ईखे यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली रुंद वरंबा सरी (बीबीएफ) पद्धतीने पेरणी केली. यामुळे मागच्या आठवड्यात संततधार पाऊस होऊनही वरंब्यावर लागवड केल्यामुळे सोयाबीनच्या पिकात पाणी थांबले नाही. रानातील पाणी बाजूला असलेल्या सऱ्यांतून वाहून गेले. सोयाबीन वाफशावर राहून झाडे तजेलदार दिसून येत आहेत. मागील वर्षी याच रानात पाणी थांबले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांचे नुकसान झाले होते. परंतु या वर्षी बीबीएफ पद्धतीने पेरणीचा फायदा झाल्याचे सांगत मोहन ईखे यांनी समाधान व्यक्त केले. किडींच्या व्यवस्थापनासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून पाच टक्के निंबोळी अर्क तयार करणे व कामगंध सापळे लावण्याचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिले तसेच बीजोत्पादन व बीबीएफ पद्धतीने पेरणी केलेल्या शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत अनुदान मिळण्यासाठी अर्ज दाखल करण्याचे आवाहन केले. प्रशिक्षक अनिकेत पोटभरे यांनी हवामान आधारित पीक सल्ला माहितीपत्रके वाटप केली.
शेतीशाळेला लहू मुळे, मारुती गायकवाड, अविनाश चव्हाण, कल्याण गायकवाड, रावण गायकवाड, किशोर गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, प्रतीक गायकवाड, कमलेश गायकवाड, सोपान पौळ, महादेव गायकवाड, बन्सी गायकवाड, दिलीप मुळे, ऋषीकेश चव्हाण, बाळासाहेब चव्हाण आदी शेतकरी उपस्थित होते.
पिकांचे निरीक्षण
रुंद वरंबा सरी तंत्रज्ञानाचे फायदे इतर शेतकऱ्यांनी समजून घेण्यासाठी उपविभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी शेतीशाळा वर्गाच्या प्रक्षेत्रावर शेतीशाळा घेऊन शेतकऱ्यांना निरीक्षणे दाखवली असता शेतकऱ्यांनी पारंपरिक पेरणीचे सोयाबीन पिवळे पडले, पाणी साठून राहिल्यामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्याचे सांगितले. येळकर यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा फायदा विस्तृतपणे समजावून सांगितला.
210721\1439-img-20210721-wa0005.jpg
पळसखेड येथे हवामान अनुकूल शेतीशाळेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना उप विभागीय प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांच्या सह शेतकरी.