पुरूषोत्तम करवा
माजलगाव : आजाेबांचे बायपास, मुलगा, नातवाची ॲन्जिओप्लास्टी, सुनेला मधुमेह अशा सहव्याधी असूनही कुटुंबातील २२पैकी पॉझिटिव्ह आलेल्या ११ जणांनी धीर देत एकमेकांचे मनोबल वाढवत प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनावर मात केली.
शहरातील व्यापारी भिकचंद उत्तमचंद दुगड (९०) यांना चार मुले असून, संयुक्त कुटुंब आहे. ४ महिन्यांपूर्वी घरात एका सदस्याला त्रास होत असल्याने कोरोना टेस्ट केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर घरातील २२ सदस्यांनी कोरोनाची टेस्ट केली होती. त्यात घरातील ११ जण पॉझिटिव्ह निघाले. त्यात ९० वर्षांचे असलेले भिकचंद उत्तमचंद दुगड यांचा समावेश होता. त्यांचे १३ वर्षांपूर्वी बायपास करण्यात आले होते. भिकचंद दुगड यांचा धाकटा मुलगा सुभाषचंद (५५) व नातू रोहित सतीश दुगड (३५) हे पॉझिटिव्ह आले. त्यांची ॲन्जिओप्लास्टी झाली होती. त्याचबरोबर मोठा मुलगा प्रकाश दुगड (६५), सुना प्रभा प्रकाश दुगड (६०), उषा सुभाषचंद दुगड (५२), सुनंदा सुरेश दुगड (८), नातू विशाल प्रकाश दुगड (४२) राहुल सुभाष दुगड (२५) , नातसून आश्विनी विशाल दुगड (३८) त्यांची पणती सुहानी विशाल दुगड (६) हेही पॉझिटिव्ह आले. यापैकी प्रभा दुगड यांना मधुमेह आहे.
या दहा जणांपैकी भिकचंद व प्रकाश दुगड यांना पुण्यात त्यांची नात डॉ. सारिका व नातजावई डॉ. नीलेश भंडारी यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. यातील काही जणांनी घरी, तर काहींना अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव या ठिकाणी शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले होते.
दुगड परिवारातील ११ जण पॉझिटिव्ह आले होते. इतर दहा सदस्यांची घालमेल होत होती. तरीही आवश्यक सेवा, सुविधांसाठी काही जण सक्रिय राहिले. पॉझिटिव्ह आलेल्या ११ जणांनी न घाबरता एकमेकांना धीर देत मनोबल वाढविले. आता या सर्वांची प्रकृती ठणठणीत असून, हे कुटुंब कोरोनाचे सर्व नियम पाळून आपआपल्या व्यवसायात रमलेले आहेत.
आपली इच्छाशक्ती व जगण्याची इच्छा असेल तर आपण कोणालाही नमवू शकतो, हे भिकचंद दुगड यांनी दाखवून दिले. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांनी त्यांचा आदर्श घेतल्यास ते उपचार घेऊन लवकरच घरी परतु शकतील.
फोटो : भिकचंद दुगड (वय ९०)
===Photopath===
060521\purusttam karva_img-20210502-wa0006_14.jpg