माजलगाव
: येथील नगर पालिकेने स्वच्छतेचे टेंडर देऊनही शहरात जागोजागी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे सध्या डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने मलेरिया, डेंग्यू रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत असताना नगर पालिकेचे याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे.
नोव्हेंबर महिन्यात येथील नगर पालिकेने जवळपास दोन कोटी रुपयांचे स्वच्छतेचे टेंडर काढले होते. या टेंडरधारकाने सुरुवातीचे दोन महिने चांगले काम केले होते. परंतु नगर पालिकेच्या काही कर्मचाऱ्यांकडून व पदाधिकाऱ्यांकडून वारंवार अडवणूक होत असल्याचे ठेकेदाराकडून वारंवार सांगितले जात होते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला काही दिवस कामही बंद ठेवले होते. नंतर ठेकेदार, पदाधिकारी व काही कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन त्यात ठेकेदाराने संबंधितांची बोळवण केल्याचे बोलले जात होते. यामुळे संबंधित ठेकेदाराने वाहन व स्वच्छता करणाऱ्या कामगारांची संख्या निम्म्यावर आणली असल्याचे नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
यामुळे शहरातील मुख्य रस्ता व पदाधिकारी यांच्या घराच्या आजुबाजुला नाली काढणे व स्वच्छता करण्याचे काम संबंधित ठेकेदाराने सुरू केले. उर्वरित भागात महिन्या - दोन महिन्याला कधीतरी एखाद्या वेळेस स्वच्छता व नाल्या काढण्यात येत आहेत. यामुळे शहरात जागोजागी तुंबलेल्या नाल्या व साचलेली घाण पाहावयास मिळत आहे.
नगर पालिकेचे कर्मचारी व पदाधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मलिदा मिळाल्याने प्रभागात घाण होऊनही ते संबंधित ठेकेदारास बोलू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. यामुळे शहरात सध्या जागोजागी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने व शहरात मोठ्या प्रमाणावर डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने घरोघरी ताप, मलेरिया, डेंग्यू आदी आजारांच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे.
सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरात तापाचे रुग्ण वाढू लागल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. असे असताना नगर पालिकेचे पदाधिकारी व कर्मचारी मात्र आपल्या स्वार्थासाठी शहरवासीयांच्या आरोग्याशी खेळ खेळत आहेत.
------
नागरिक धडा शिकविण्याच्या तयारीत
नगर पालिकेत पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त नगरसेवक विरोधी पक्षाचे असताना एकही विरोधी नगरसेवक याविरोधात आवाज उठवायला तयार नाही. यामुळे येणाऱ्या निवडणुकीची तसेच विद्यमान नगरसेवकांनी पुन्हा निवडणुकीत उभे राहावे, याची सध्या नागरिक वाट पाहताना दिसत आहेत.
----
स्वच्छतेचे टेंडर ज्या व्यक्तिला देण्यात आले आहे. त्यांनी अचानक आठ, दहा दिवसांपूर्वी काम बंद केले होते. तरीदेखील आम्ही रोजंदारी कर्मचारी लावून शहरातील स्वच्छतेचे काम केले. आता शहरातील स्वच्छतेचे काम पुन्हा सुरू झाले असून, जागोजागी साचलेली घाण हटवण्यात येईल.
--- शेख मंजूर, नगराध्यक्ष, माजलगाव.
----------
190721\11495326img_20210718_120414_14.jpg