बीड : जिल्ह्यात विकासामध्ये नरेगा ही योजना महत्त्वाची आहे. त्यामुळे या वर्षात आराखड्यानुसार अनेक कामे सुरु केली जातील, आणि त्या कामांना गती देखील दिली जाईल. दरम्यान या कामांच्या संदर्भात वेळोवेळी तपासणी केली जाईल, कामात गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाईदेखील होईल, अशी माहिती बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
मागील वर्षभरापासून जिल्ह्यात नरेगाची कामे ठप्प आहेत. १०३१ ग्रामपंचायतींपैकी ४७९ गावांमध्ये शून्य रुपये खर्च करण्यात आला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध केले होते. ही बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर नरेगाच्या कामांना गती दिली जाईल. यात गैरप्रकार होऊ नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेऊन गैरप्रकार उघडकीस आल्यास कठोर कारवाई केली जाईल. मात्र, गैरप्रकार होईल त्यामुळे कामेच बंद ठेवायची असे केले जाणार नाही असे देखील जिल्हाधिकारी म्हणाले. आपण नरेगाच्या सद्यस्थितीचा अहवाल घेऊन या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले. बीड जिल्ह्यात मागील वर्षभरात तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या भूमिकेमुळे नरेगाची कामे ठप्प पडली होती. रेखावार यांनी चक्क ग्रामपंचायतींवर अविश्वास दाखवत अनेक कामांचे वाटप विविध विभागात करण्याचे संकेत दिले होते. तसेच नरेगामध्ये भ्रष्टाचार होतो म्हणून कामेच मंजूर न करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर नूतन जिल्हाधिकारी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
विभागानुसार आढावा घेऊन करणार सुरुवात
जिल्ह्यातील कोणत्या विभागामार्फत कामे केली जातात. तसेच त्यांच्याकडे कामांची मागणी आहे का? पूर्वी केलेल्या कामांमधील गैरप्रकारामध्ये कोणाचा संबंध आहे,याचा आढावा घेऊन पुन्हा कामे सुरु केली जाणार आहेत. तसेच शासन निर्णयाप्रमाणेच सर्व नियम योजनेसाठी लागू असतील असे जिल्हाधिकारी जगताप यांनी सांगितले.