- धर्मराज हल्लाळे
परळी (जि. बीड) : भगवानबाबा गडावर आलेल्या जनतेचा उत्साह मी समजू शकते. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून माझे नाव घेतले, हा मला मिळालेला मोठेपणा आहे; परंतु, माझ्या मनात किंचितही इच्छा नाही. येणारे सरकार आमचे असेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होतील, असे स्पष्ट करीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी दावेदारी सांगणे ही भाजपची संस्कृती नसल्याचे म्हटले आहे.
‘लोकमत’शी बोलताना त्या म्हणाल्या, भगवानबाबा गडावर सबंध राज्यातून लोक येतात. इथे आलेल्या काही तरुणांनी उत्साह दाखविला. २०१४ मध्ये आणि पुन्हा आता अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यात लोकभावना समोर आली. ते काही कार्यकर्ते नव्हते.
कार्यकर्त्यांची भावना आहे, मग तुमची भावना काय?जनतेच्या भावनेचा आदर केला पाहिजे. परंतु, मला दावेदार दाखविले जात असेल तर ते चुकीचे आहे. २०१४ मध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार, हे मला माहीत होते. ते कर्तृत्ववान आहेत. त्यांनी उत्तम काम केले आहे. त्यामुळे पक्षानेही फडणवीस यांचेच नेतृत्व राज्यात मान्य केले आहे.
भविष्यातही दावा नाही का?
पक्ष मोठा आहे. संघटन मोठे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासारखे दिग्गज नेतृत्व लाभले आहे. त्यांना सगळ्यांच्या क्षमता आणि भविष्य माहीत आहे. त्यांना दूरचे कळते. शिवाय, दावा करायला माझी व्यक्तिगत मालमत्ता नाही. त्यामुळे अकारण नवीन चर्चा वाढवू नये.
निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल करणे सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीचे ठरले का? गुन्हा दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. शरद पवार यांचे राजकारणही प्रदीर्घ व मोठे आहे. ते अनुभवी आहेत. त्यांना गुन्हा आत्ताच दाखल का झाला, हे कळते. त्यात सरकारचे राजकारण नाही.
मतदारसंघातच तुम्ही अडकलात का? मी राज्यभर सभा घेत आहे. माझ्यासाठी परळीची लढाई अटीतटीची नाही. मराठवाड्यातील नेतृत्वाला डावलले जाते का? तिकीट वाटपात नाराजी झाली? यावर पंकजा मुंडे म्हणाल्या, नेतृत्व मराठवाड्यातील असो, विदर्भातील की पश्चिम महाराष्ट्रातील. ते ब्रेक करण्याचा प्रयत्न कोणी करू नये. तसे झाले, तर ते अजून मोठे होते हा इतिहास आहे. मुळात तसे घडलेले नाही. तसेच तिकीट वाटपात युती करणे याला प्राधान्य होते. त्यामुळे काही ठिकाणी नाराजी झाली. ज्यांना तिकीट मिळाले नाही, त्यांनी स्वत: पुढे येऊन निर्णय मान्य असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा ते उगाळणे नको.