बीड : परीक्षा केंद्रात प्रवेश करताना मेटल डिटेक्टरद्वारे परीक्षार्थींची तपासणी केली जाते. मात्र, मेटल डिटेक्टर यंत्राला मायक्रो डिव्हाइस कनेक्टर व इतर साहित्य शोधता येऊ नये म्हणून आरोपी परीक्षार्थीने चक्क एकावर एक अशा सात अंडरवेअर परिधान करून डिव्हाइस लपविल्याची धक्कादायक बाब चौकशीतून समोर आली आहे. सरकारी परीक्षांमध्ये हायटेक पद्धतीने कॉपी करून पास करण्याचे एक मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय महसूल अधिकाऱ्यांसह पोलिसांना आहे. शहरातील स्वामी विवेकानंद कॉम्प्युटर सेंटर येथे पुरवठा निरीक्षक या पदासाठी २८ फेब्रुवारी रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली गेली. त्यावेळी परीक्षार्थी लहू मच्छिंद्र काळे (रा. बकरवाडी, ता. बीड) हा बाथरूममध्ये बराच वेळ थांबल्याने त्याच्यावर केंद्रावरील कर्मचाऱ्यांना संशय आला. तो परतल्यानंतर त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे मायक्रो डिव्हाइस व इतर साहित्य आढळून आले. परीक्षार्थींची केंद्रात सोडताना मेटल डिटेक्टर मशीनद्वारे तपासणी केली जाते. इलेक्ट्रॉनिक साहित्य जसे की मोबाइल व इतर वस्तू शर्टच्या आतमध्ये लपविल्या असतील तर मशीनची बीप वाजते. ही बाब आरोपी लहू काळे यास माहिती असल्याने परीक्षा केंद्रावर जाण्यापूर्वी त्याने एकावर एक अशा सात अंडरवेअर परिधान करून त्याच्या आतमध्ये मायक्रो डिव्हाइस कनेक्टर व इतर साहित्य लपविले होते.
मास्टर माइंड कोण? एक ते दोन वर्षांपूर्वी आरोग्य विभाग घोटाळ्याचे कनेक्शन बीड तालुक्यातील बकरवाडीसोबत जोडले गेले होते.आता ब्लुटूथ मायक्रो डिव्हाइसद्वारे कॉपी करताना पकडलेला लहू काळेसुद्धा बकरवाडीचाच आहे.हा योगायोग आहे की, अन्य दुसरा प्लॅन हे शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.यामागचा मास्टर माइंड कोण आहे? या टोळीत कितीजण सक्रिय आहेत? यापूर्वी अशा किती परीक्षा काळे याने दिल्या आहेत?या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधणे आवश्यक आहे.