- संजय खाकरे
परळी : देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेल्या प्रभू श्री वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी दुसऱ्या श्रावण सोमवारी (दि 27) भाविकांची गर्दी झाली आहे. रविवारी पुत्रदा एकादशी आल्याने भक्तांची वैद्यनाथ मंदिरात गर्दी उसळली होती. रविवारी रात्री दहा वाजल्यापासूनच दुसऱ्या श्रावण सोमवारनिमित्त वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात भक्तांची रीघ लागली होती. आज सकाळी नऊ वाजेपर्यंत हजारो शिवभक्तांनी हर हर महादेव जयघोष करीत प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले.
आज दुसऱ्या श्रावण सोमवारी महिला भक्तांनी शिवामूठ तीळ व बिल्वपत्र वाहिले. पुष्पमाळांनी वैद्यनाथ मंदिर सजवण्यात आले आहे. दरम्यान, लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील निवाडा ते परळी पायी दिंडीचे रविवारी परळीत आगमन झाले. पायी दिंडीतील 72 जणांनी सोमवारी पहाटे प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेतले. निवाडा येथील संगमेश्वर मंदिर दिंडी सोहळा 2009 पासून होतो. प्रत्येक श्रावणात दुसऱ्या सोमवारी ही दिंडी परळीत वैद्यनाथाच्या दर्शनासाठी येते असे दिंडी चालक सुभाष आप्पा लकडे यांनी आज दर्शनानंतर सांगितले. दुसऱ्या श्रावण सोमवारी राज्य व परराज्यातील अनेक भाविक वैद्यनाथाच्या दर्शनासाठी आले आहेत. मंदिर परिसरात प्रसाद साहित्य ,खेळणी, हॉटेल, पेढे विक्री दुकाने गजबजल्याचे दिसून आले.