- पुरूषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथील पुरूषोत्तमाच्या दर्शनासाठी अधिकमासानिमित्य भाविकांना येता आले नसल्यामुळे या ठिकाणी मागील एक महिन्यात शुकशुकाट दिसून आला तर या ठिकाणीच्या ट्रस्टी बरोबरच यात्रेतील छोट्या मोठ्या व्यावसायिकांना करोडो रुपयांचा फटका बसला. शुक्रवारी अधिकमासाची सांगता होणार असून भाविकांना पुरूषोत्तमाच्या दर्शनासाठी तीन वर्षे वाट पहावी लागणार आहे.
अधिकमासाला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व असुन भारतात पुरूषोत्तमाचे केवळ एकच मंदिर असून ते बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील पुरूषोत्तमपुरी येथे चालुक्य काळातील पुरूषोत्तमाचे मंदिर असुन दर अधिकमासाला भारतातुन लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. हे मंदिर गोदावरी नदीच्या तीरावर असुन भाविक या ठिकाणी जाऊन गोदास्नान करून दर्शन घेतात यामुळे पुण्यफळ मिळत असल्याचा भाविकांची धारणा आहे.या महिण्याभरात येणारे भाविकभक्त पुरूषोत्तमाला कोणत्याही ३३ वस्तु देवाला वाहतात.अनारसे व पुरणाच्या नैवेद्याला या ठिकाणी खुप महत्त्व असल्याने भाविक हा नैवेद्य घेऊन याठिकाणी येतात.
या ठिकाणी महिनाभर मंदिर परिसरात विविध पुजेच्या साहित्याबरोबरच प्रसाद , खेळण्या आदि साहित्याच्या दुकाना या ठिकाणी लावल्या जातात.यामुळे दरवर्षी छोट्या मोठ्या व्यावसायिकांचा व्यवसायातुन चांगली कमाई होत असे.त्याचबरोबर दरवर्षी महिण्याभरात २० ते २५ लाख भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर ट्रस्टला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळत असे.
यावर्षी कोरोनामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्यावरून हे मंदिर महापूजा करून बंद ठेवण्यात आले होते. यामुळे दुकाने लावण्यासाठी आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला जातो. परंतु यावर्षी तशी करण्याची वेळच आली नाही. कोरोनामुळे ट्रस्ट व छोट्या मोठ्या व्यावसायिकांना करोडो रुपयांचा फटका बसला आहे. त्याच बरोबर भाविकांना देखील पुरूषोत्तमाच्या दर्शनासाठी तीन वर्षे वाट पहावी लागणार आहे.
उत्तर महापूजेने होणार अधिकमासाची सांगताअधिकमासारंभाची सुरूवात तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, माजी आ. आर.टी.देशमुख, माजलगाव सभापती नितीन नाईकनवरे यांच्या हस्ते सहपत्नीक महापुजा करण्यात आली होती. त्यानंतर मंदिर बंद ठेवण्यात आले होते व आता शुक्रवारी अधिकमासाची समाप्ती उत्तर महापुजेने होणार असून ही महापुजा तहसीलदार वैशाली पाटील व गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. दरवर्षी शेवटच्या दिवशी महाप्रसाद करण्यात येत असे परंतु कोरोनामुळे यावर्षी महाप्रसादाची पंगत रद्द करण्यात आली असल्याची माहिती या ट्रस्टचे उपाध्यक्ष विजय गोळेकर यांनी दिली.
जावयांचाही हिरेमोडअधिकमास (धोंडा) महिना आलाकी जावयांची चांदी असायची .या महिन्यात जावयांना बोलावले जाते. त्यातल्या त्यात विशेष करून नवीन लग्न झालेल्या जावयांना व मुलींचे सासरे, सासु, नणंद, दी आदींना सासरकडील मंडळीकडुन बोलावून त्यांना आपल्या आवाक्यानुसार सोन्याची वस्तू धोंड्यात घालून देतात. परंतु यावर्षी कोरोनामुळे जुन्या तर सोडाच, नवीन जावयांना देखील सासरकडील मंडळींनी बोलावले नाही.यामुळे जावयांचा चांगलाच हिरेमोड झाला असुन त्यांना धोंडयातील मजा घेण्यासाठी तीन वर्षे वाट पहावी लागणार आहे. यामुळे नवीन जावई व नातेवाईकांच्या कोरोनामुळे मात्र हिरमोड झाला आहे.